दोन महिलांचे मंगळसुत्र खेचले
नाशिक : शहरात चैनस्नॅचरांचा सुळसुळाट झाला असून पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे ओरबाडले जात आहे. नुकत्याच वेगवेगळ्या भागांमध्ये घडलेल्या घटनेत दोन महिलांचे मंगळसुत्र भामट्यांनी हिसकावून नेले. याप्रकरणी गंगापूर आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कॉलेजरोड भागात राहणारे प्रितीश प्रकाश खटोड (रा.कृषीनगर जॉगिंग ट्रॅक जवळ) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, खटोड दांम्पत्य बुधवारी (दि.३०) शतपावलीसाठी घराबाहेर पडले होते. येवलेकर मळा परिसरातील सेव्हन स्ट्रीट कॅफे हॉटेल समोरून दांम्पत्य जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी खटोड यांच्या पत्नीच्या गळयातील सुमारे ५० हजार रूपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत. दुसरी घटना सिडकोतील खुटवडनगर भागात घडली. कामटवाडा परिसरात राहणा-या रंजना विलास वैद्य (रा.मटाले मळा) या गुरूवारी (दि.१) रात्री जेवण आटोपून पती समवेत फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. लोकमान्य मल्टी को आॅप बँकेसमोरून वैद्य दांम्पत्य जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे ६० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोल्हे करीत आहेत.
……
उघड्या घरातून दागिणे चोरी
नाशिक : उघड्या घरात शिरून चोरट्यांनी सुमारे सव्वा लाख रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. ही घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुप्रिया संदिप शिंदे (रा.धर्माजी कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली. शिंदे या अल्पशा कामानिमित्त इमारतीच्या खाली गेल्या असता ही चोरी झाली. घरात कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटात ठेवलेल्या डब्यातून १ लाख २० हजार रूपये किमतीचे दागिणे लंपास केले. अधिक तपास सहायक निरिक्षक सुर्यवंशी करत आहेत.
…
म्हसरूळला महिलेचा विनयभंग
नाशिक : दरवाजात उभ्या असलेल्या महिलेचा हात पकडून एकाने विनयभंग केल्याची घटना म्हसरूळ येथे घडली. याप्रकरणी पोलीस दप्तरी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूण नंदु जाधव (३०, रा. म्हसरूळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून, गुरूवारी (दि.१) दुपारच्या सुमारास ती आपल्या घराच्या दरवाजात उभी असताना तेथून जाणा-ा संशयीताने तिचा विनयभंग केला. तू मला आवडतेस व तूला काही कमी पडू देणार नाही असे म्हणत संशयीताने हे कृत्य केले. यावेळी संशयीताने नकार दिल्यास महिलेस बदनामी करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक भडीकर करत आहेत.
…..
फुलेनगर येथील एकाची आत्महत्या
नाशिक : फुलेनगर येथील ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
रविंद्र किसन ताठे (रा. ५६ नंबर शाळेजवळ,फुलनगर) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. ताठे याने गुरूवारी (दि.१) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लाकडी दांड्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार काझी करीत आहेत.
……
दारूसाठी एकास मारहाण
नाशिक : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणातून चार जणांच्या टोळक्याने एकास बेदम माहाण केल्याची घटना एकलहरे रोड भागात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश पारीचा, रोहित पारिचा, परमजित ग्राय उर्फ काक्या, आकाश चाजलाने उर्फ अक्कू अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अमिन फारूख पठाण (रा. जुना सायखेडारोड, आरिंगळे मळा) याने तक्रार दाखल केली आहे. पठाण गेल्या रविवारी (दि.२७) अरिंगळे मळयातील ऋषीकेश किराणा दुकाना समोर उभा असतांना ही घटना घडली. आकाश पारिचा या परिचीताने त्यास गाठून दारू पिण्यासाठी पैश्यांची मागणी केली. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाल्याने संतप्त झालेल्या पारिचा याने अन्य संशयीतांना बोलावून घेत पठाण यास लाथा बुक्कंयानी, लोखंडी रॉडने बेद मारहाण करून त्याचे हाताचे हाड फॅक्चर केले. यावेळी वाद मिटविण्यासाठी आलेल्या समीर पिंजारी यास ही टोळक्याने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले असून अधिक तपास ए.एम गांगुर्डे करत आहेत.
……
दुचाकींच्या धडकेत एक ठार
नाशिक : दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात १८ वर्षीय तरूण ठार झाला. हा अपघात त्र्यंबकरोडवरील सातपूर कॉलनी सर्कल भागात झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. रविराज मोहन रणधीर (रा. जाधव संकुल, अंबड लिंकरोड) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रविराज रणधीर हा गुरूवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास आपल्या अॅक्टीव्हा दुचाकीवर घराकडे जात असतांना हा अपघात झाला. सातपूर कॉलनी सर्कलवर पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात मोटारसायकलने अॅक्टीव्हास धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने कुटूंबियांनी त्यास तात्काळ सोपान हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
……
सायकलवरून पडल्याने एकाचा मृत्यु
नाशिक : सायकलवरून प्रवास करीत असतांना चक्कर येवून पडल्याने ५३ वर्षीय इसमाचा मृत्यु झाला. ही घटना जुना सायखेडा रोड भागात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
कृष्णा नामदेव दाभाडे (रा.आर्टिलरी सेंटर,अनुराधा थेअटरमागे) असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. कृष्णा दाभाडे हे बुधवारी (दि.३०) रात्री जुना सायखेडा रोडने आपल्या सायकलीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. भारत भुषण समोर अचानक चक्कर येवून ते सायकलीवरून पडले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
…..
ट्रकसह दुचाकी चोरी
नाशिक : शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून पार्क केलेली वाहणे पळविली जात आहे. पंचवटीत पार्क केलेला महागडा नवा कोरा मालट्रकसह अन्य ठिकाणाहून दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली असून याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरावाडीतील अनिल काशिनाथ कदम यांचा ६० लाख रूपये किमतीचा मालट्रक एमएच १५ डीके ४८४५ बुधवारी (दि.३०) रात्री आयोध्यानगरीतील अंबिका बिल्डींग समोर पार्क केलेला असतांना चोरट्यांनी पळवून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक भोळे करीत आहेत. दुसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. सागर रामेश्वर थोरे (रा.वासननगर) हे १२ सप्टेंबर रोजी पाथर्डी फाटा येथील ऋषभ होंडा शो रूम परिसरात गेले होते. शोरूम बाहेर पार्क केलेली त्यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एफपी १७१० चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक गवळी करीत आहेत.