नाशिक – नाशिक जिल्हा न्यायालयात आता फौजदारी व दिवाणी न्यायालयांचे कामकाज सकाळ सत्रातच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून तसे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यासंदर्भात न्यायालय व बार असोसिएशन यांची बैठक झाली. त्यास प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश अभय वाघवसे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे, जालिंदर ताडगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सर्व न्यायालये फक्त पहिल्या शिफ्टमध्ये चालवण्यात येतील, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यानुसार नाशिकलाही सकाळचेच कामकाज होईल. बार खोल्या बंद राहतील. गर्दी टाळण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील. २३ सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत नाशिक न्यायालयाचे कामकाज सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत सुरू राहणार आहे, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.