नाशिक – के.टी.एच.एम. विज्ञान महाविद्यालयामध्ये ११ वी सायन्स शिकणाऱ्या दिव्यांग आयुषला अभ्यासासाठी लॅपटॉपची भेट नॅबकडून देण्यात आली.. NAB युनिट महाराष्ट्राशी संपर्क करून या लॅपटॅापची मागणी केली असता, NAB ने त्वरित याची दखल घेऊन आयुषसाठी एक नवा लॅपटॉप विकत घेतला. नाशिकरोडच्या करण बॉटलिंग प्लांट प्रा. लि. यांच्याकडून याकामी मोलाचे आर्थिक सहकार्य मिळाले. २ एप्रिल २०२१ रोजी आयोजित छोटेखानी अनौपचारिक कार्यक्रमात आयुषला के.टी.एच.एम. विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वि. बी. गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा लॅपटॉप प्रदान करण्यात आला. या प्रसंगी NAB युनिट महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी स्वागत करून कोरोनाकाळात केलेल्या कामाची माहिती दिली. कोरोनाकाळात दिव्यांगांना अधिक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळे NAB चे कार्य अधिक प्रभावी व्हावे यासाठी संस्था प्रयत्नशील तर आहेच त्याबरोबर राज्यातील कोणत्याही दिव्यांग बंधू भगिनीला काही मदत लागत असेल तर संस्था ती देण्यास तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाचे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क विद्यादानाचे धोरण असल्याचे सांगून विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहतात तेव्हा त्यांचा अभिमान वाटतो असे उद्गार काढले. आयुषला महाविद्यालयीन शिक्षणासाठी लॅपटॉपची नक्कीच मोठी मदत होईल आणि त्याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त करून त्यांनी आयुषच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला नॅब युनिट महाराष्ट्राचे मानद महासचिव गोपी मयूर, मानद सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मानद खजिनदार सीए विनोद जाजू, संचालक विनोद जाधव, के.टी.एच.एम. कॉलेजचे प्राध्यापक श्री शिंदे, आयुषचे वडील राजेश खैरे हे उपस्थितीत होते.