नाशिक – केंद्रीय विद्यालयाच्या प्राथमिक शिक्षिका सौ.माधुरी विजय देवरे यांना सेवादीप मानव सेवा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अकरावे अखिल भारतीय प्रतिभा संमेलनात मानव सेवा विकास फाऊंडेशन या एनजीओ संस्थेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्य व प्रतिभावंतांचा गौरव सोहळा करण्यात आला. त्यात विविध क्षेत्रातील त्यांच्या प्रशंसनीय कार्याच्या जनसेवेबद्दल तथा कोरोना काळात विविध सेवा देणाऱ्या प्रतिभावंत कलावंतांना हा पुरस्कार देण्यात आला.
सौ. माधुरी विजय देवरे यांच्या कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण पद्धती साठी व त्यांच्या इतर समाजकार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अकरावे अखिल भारतीय प्रतिभा संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर अरुण पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने झाला. पुरस्कार सन्मान पत्र त्यांना सोमवारी पोस्टाने प्राप्त झाले. या पुरस्कार मिळाल्यानंतर देवरे यांचे केंद्रीय विद्यालयातील प्राचार्य बाळासाहेब लोंढे, उपप्राचार्य सौ समता जांगडेकर, हेडमास्तर मनीष हवारगे व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.