चांदवड – केंद्र सरकारने पारीत केलेल्या शेतकरी कृषीबिलाच्या संदर्भात विरोधकांकडून अपप्रचार केला जात असून तो शेतकरी विरोधी असल्याचा हेतुपुरस्करपणे कांगावा केला जात आहे, असे सांगत दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॅा. भारती पवार हे थेट शेतक-यांच्या बांधावर गेल्या. येथे त्यांनी शेतक-यांशी संवाद साधून कृषीबिल कसे शेतकरी हिताचे आहे याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे समजावून सांगितले.
शनिवारी त्या चांदवड तालुक्यातील चांदवड, देणेवाडी, दुगाव, उमराणे येथे गेल्या. येथे शिवारातील शेतकऱ्यांशी त्यांनी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी कांदा उत्पादक शेतकाऱ्यांशीही चर्चा करत त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. देणेवाडीचे प्रगतिशील शेतकरी गोरख ढगे यांच्या शेतावर परिसरातील अन्य शेतकऱ्यांशी चर्चा करून नंतर कमी क्षेत्रात फुल शेतीद्वारे, मत्स्य शेतीद्वारे अधिकचे उत्पन्न मिळवणारे शेतकरी शिवाजी मोरे यांच्या शेतावर जाऊन भेट दिली व त्यांचे कौतुक केले. शेतीत नवनवीन प्रयोग करून आपले उत्पन्न कसे वाढेल याकडे शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन खा.डॉ.भारती पवार यांनी याप्रसंगी केले. या भेटीत प्रा.सचिन निकम, गोरख ढगे, शिवाजी मोरे, नामा मोरे, संजय जाधव, अंबादास ढगे, अंबादास घोलप आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
आता विक्रीचे कुठलेही बंधन नाही
यावेळी डॉ.भारती पवार म्हणाल्या की, शेतकररी आपला शेतमाल हा देशातील कुठल्याही बाजरपेठेत विकू शकतो. त्याला आता विक्रीचे कुठलेही बंधन नाही. त्यामुळे यात शेतकऱ्यांचेच हित असून त्यांना आता पूर्वीपेक्षा अधिक आर्थिक फायदा होणार आहे. शिवाय शेतकरीवर्ग राज्यातील कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही माल विकू शकतो. त्यावर कुठलेही बंधन नाही. विरोधक फक्त विरोधासाठी या बिलाचे राजकीय भांडवल करत असून त्यात शेतकरी भरडला जात आहे. शेतकऱ्यांनी या कृषी बिलाबाबत आश्वस्थ राहावे.