नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत रविवार २२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पालक,शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी निश्चिंत रहावे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करायचा की नाही याबाबत विविध प्रकारचे मतमतांतरे माझ्यापर्यंत येत आहेत. काही पालकांच्या मते शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची भीती आहे तर काही पालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पाल्याची चिंता सतावत आहे. एकीकडे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची भीती आहे तर दुसरीकडे या महामारीची लागण झाल्यास संघर्ष कसा करावा हा प्रश्न असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, एकीकडे राज्य शासन हळूहळू सर्व क्षेत्र अनलॉक करत असून शाळा तेवढ्या बंद का ठेवाव्यात असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्व प्रकारचे सुरक्षिततेचे उपाय योजून शाळा सुरू करता येईल असा एक मतप्रवाह आहे. मात्र या सर्वात केंद्रस्थानी पालकवर्ग असून त्यांचा मतप्रवाह मला सर्वात महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे घाईघाईत कोणताही निर्णय जाहीर करण्यापेक्षा उद्या रविवार २२ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी काही महत्त्वाचे मुख्याध्यापक व पालक संघटना यांची बैठक घेऊन शाळा सुरू करायचा की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
त्यांनी म्हटले आहे की, सर्वच ठिकाणी शाळा बंद ठेवणे देखील अन्यायकारक ठरू शकते. त्यामुळे ज्या भागात कोरोनाची लागण होण्याची शक्यता अत्यंत तुरळक आहे अशा ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर शाळा सुरू करता येतील का याबाबत मतमतांतरे जाणून घेतली जातील. सर्व पालक तसेच शिक्षक वर्ग किंबहुना विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावे. निश्चितच त्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.