दुकानातून रोकड असलेली पर्स चोरी
नाशिक : कपडे खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या भामट्यांनी महिलेची पर्स चोरून नेल्याची घटना बापू बंगला भागात घडली. या पर्स मध्ये २० हजाराची रोकड होती. तसेच या भामट्यांनी एटीएमच्या माध्यमातून १७ हजार ६७० रूपये परस्पर काढून घेतले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनंदा रमेश कोठावदे (रा.मानसी अपा.बापू बंगला) यांनी तक्रार दाखल केली आहे. कोठावदे यांचे बापू बंगल्या जवळी यशोधन सोसायटीत रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. सोमवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास कोठावदे या दुकानात असतांना अंडरवेअर खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन युवकांनी ही चोरी केली. कोठावदे या अंडरवेअरचा बॉक्स काढत असतांना काही कळण्याच्या आत दोघा भामट्यांनी गल्याच्या काऊंटरमध्ये हात घालून त्यांची पर्स घेवून पोबारा केला. या पर्स मध्ये २० हजाराची रोकड,वेगवेळया बँकाचे दोन डेबीट कार्ड होती. या घटनेत चोरट्यांनी पर्स पळविल्यानंतर काही वेळातच आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम कार्डचा वापर करून परस्पर १७ हजार ६७० रूपये काढून घेतले असून अधिक तपास पोलीस नाईक बरेलीकर करीत आहेत.
……..









