नवी दिल्ली – येथील डिव्हाइन ग्रुप यांच्यातर्फे होत असलेल्या मिस अर्थ इंडिया-२०२० स्पर्धेत नाशिकच्या श्रीया स्वप्नील तोरणे हिने मिस अर्थ इंडिया इको टुरिझम – २०२० हा किताब आणि मुकूट पटकविला आहे. या अगोदरच्या फेरीमध्ये बेस्ट रॅम्पवॉक हे सबटायटल देखील जिंकले होते. या स्पर्धेत मिळालेल्या यशानंतर तिला भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याची संधी आहे.
मिस अर्थ इंडिया-२०२० स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत देशभरातील असंख्य युवतींनी सहभाग नोंदविला होता. यातून पात्रता फेरीसाठी ४० युवतींची निवड करण्यात आली होती. पुढील १५ स्पर्धकांची निवड करत त्यांच्याकडून विविध आव्हाने पार पाडण्यात आली.
या स्पर्धेकरिता वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. दरम्यान, या पंधरा स्पर्धकांमधून अंतिम सहा उमेदवारांची निवड करण्यात आली होती. तिने यापूर्वी मिस टीन युनिव्हर्स इंडिया, मिस टीजीपीसी इलाइट या राष्ट्रीय स्पर्धांचे विजेतेपद पटकाविले आहे. या स्पर्धेसाठी तिने इंस्टाग्रामवर सुरु केलेल्या #healwiththeearthbyst या ’निसर्ग संवर्धन करुन आपले मानसिक व शारिरीक आरोग्य चांगले राखा’ या संकल्पनेचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांची श्रीया कन्या आहे. तर, माजी जिल्हा माहिती अधिकारी सुधाकर तोरणे यांची नात आहे. या यशाबद्दल श्रीयाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.