नाशिक : कापूर वडी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी विक्रीच्या नावाखाली तरूणास सव्वा पाच लाख रूपयांस गंडविण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. ही फसवणुक आॅनलाईन करण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णम रघूनाथ लोहे (रा.रोहिणीनगर,पेठरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. लोहे यांना व्यवसाय सुरू करायचा असल्याने ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून नवीन व्यवसायाची तपासणी करीत होते. याच काळात त्यांना एका मेलवरून कापूर वडी तयार करण्याबाबतच्या व्यवसायाची माहिती मिळाली. त्यांनी मेलवर प्रत्युत्तर दिले असता त्यांच्याशी ९१६३७९७८६७३९, ८०४५८०४५६९ व ६३८४१४५०५० या क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. एन.प्रभाकरण या भामट्याने कापुर वडीचा कच्चा माल स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवून हा गंडा घातला. प्रभाकरण यांच्यावर विश्वास ठेवल्याने लोहे यांना १४ जानेवारी नंतर वेळोवेळी आंध्र बँकेत ५ लाख १५ हजार ७४५ रूपये आॅनलाईन भरण्यास भामट्यांनी भाग पाडले. महिना उलटूनही कच्चा माल लोेहे यांना न मिळाल्याने त्यांनी बँकेत चौकशी केली असता आपली फसवणुक झाल्याचा प्रकार समोर आला. त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी करीत आहेत.