नाशिक – मराठा विद्या प्रसारक समाजाचे समाजकार्य महाविद्यालय आणि नवजीवन फाउंडेशन संचालित चाईल्डलाईन तर्फे मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार आणि नवजीवन फाउंडेशनचे प्रमुख सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बालदिनाच्या पार्शवभूमीवर ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे बालदिनाच्या पूर्व संध्येला बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी परीक्षक म्हणून मविप्र समाज संस्थेचे कलाशिक्षक सोमेश्वर मुळाणे आणि प्राचार्य डॉ.विलास देशमुख उपस्थित होते.
कोविड 19 अर्थात कोरोना या विषाणू बाबत बालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि चाईल्डलाईन १०९८ या मोफत क्रमांकाच्या जनजागृती साठी या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.. यावेळी बालकलाकारांनी या चित्रकला स्पर्धेत कोरोना महामारी बदलते जीवन, ऑनलाइन शिक्षण-घरातून शाळा, कोविड-१९ चे खरे योद्धे आणि उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगले या विषयावर त्यांच्या मनातील संकल्पना आपल्या कल्पनाशक्तीने चित्राच्या रुपात रेखाटले.
यावेळी सोमेश्वर मुळाणे यांनी सर्व बालकलाकारांचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले यातच त्यांनी विजय मिळवला असे बोलून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
यावेळी नाशिक शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रतिसाद दिला.. यामध्ये वाय.डी बिटको गर्ल्स हायस्कुलची नंदिनी विश्वकर्मा प्रथम, मराठा हायस्कुलची हर्षाली पाटील द्वितीय, श्रीराम विद्यालयचा प्रथमेश चौधरी तृतीय तर मराठा हायस्कुलचा क्रिष्णा आहिरे आणि भोसला मिलिटरी शाळेची दिपाली जाधव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून बक्षिसे मिळवली आणि इतर सहभागी विद्यार्थ्यांना सहभागासाठी प्रमाणपत्रे मिळाली.
यावेळी समन्वयक प्रणिता तपकिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर चाईल्डलाईन केंद्र समन्वयक प्रवीण आहेर यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. सुनीता जगताप, विजेत्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजकार्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी देवयानी भारती, स्वाती डावरे, रोहिणी पाटील, अश्विनी अहिरराव आणि वैशाली महाजन यांनी सहकार्य केले.