नाशिक : एस.टी.चालक आणि वाहकास मारहाण करणा-या रिक्षा चालकास न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुुनावली. ही घटना शालिमार चौकात २००९ मध्ये घडली होती. अनिल पांडूरंग कोरडे (२६ रा.शिवाजीवाडी,नासर्डी पूल) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष रामू देवकर या एस.टी.चालकाने तक्रार दाखल केली होती. देवकर हे ११ डिसेंबर २००९ रोजी देवळाली कॅम्प या शहर बसवर (एमएच १२ एयू ९४६६) सेवा बजावत असतांना हा प्रकार घडला होता. शालिमार चौकात त्यांनी एस.टी.बस समोर उभी असलेली अॅटोरिक्षा एमएच १५ झेड ७६४९ बाजूला घेण्यास सांगितल्याने हा वाद झाला होता. संतप्त अनिल कोरडे या चालकाने बस चालक देवकर व वाहक राजू डगळे यांना शिवीगाळ व धमकी देत लाथाबुक्यांनी तसेच लाकडी दांडक्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपनिरीक्षक आर.बी.रसेडे यांनी या गुह्याचा तपास करून पुराव्यानिशी दोषारोप पत्र जिल्हा न्यायालयात सादर केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय,क्रमांक ९ चे न्या.एम.ए.शिंदे यांच्या समोर चालला. सरकारतर्फे आर.वाय सुर्यवंशी यांनी काम पाहिले. तर पोलीस कर्मचारी टी.ई.लभडे आणि आर.आर.जाधव यांनी खटला यशस्वीतेसाठी पाठपुरावा केला. या खटल्यात फिर्यादी,साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष तसेच तपासी अधिका-यांनी सादर केलेला पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी अनिल कोरडे यास एक वर्षाचा सश्रम कारावास आणि तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.