एटीएममधील कॅश लंपास करणारे कर्मचारी जेरबंद
नाशिक : एटीएम मध्ये भरलेली साडे आठ लाख रूपयांची रोकड पासवर्डचा वापर करून दोघा कर्मचा-यांनी लांबविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी एटीएममध्ये कॅश भरणा-या कंपनीच्या दोघा कर्मचा-यांनी बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपहराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव काशिनाथ वर्पे आणि लुकमान मुबारक तडवी (रा.टाकळी रोड) अशी संशयीतांची नावे असून ते टाटा इंडिया कॅश कंपनीचे कर्मचारी आहे. कंपनीच्या माध्यमातून शहरातील विविध बँकाच्या एटीएममध्ये रोकड भरण्याचे कामकाज चालते. संशयीतांनी गेल्या शनिवारी (दि.३१) रोजी रात्री काट्या मारूती चौक आणि मखमलाबाद नाका येथील एटीएममधून कंपनीच्या गोपनिय पासवर्डचा वापर करून ८ लाख ५६ हजार ६०० रूपयांची रोकड परस्पर काढून रकमेचा अपहार केला. हा प्रकार एटीएम सेंटर मधील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून उघड झाल्याने याप्रकरणी कंपनीचे आसिफ शेख(रा.वडाळागाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी संशयीतांना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
……
तिडके नगरला लाखाची घरफोडी
नाशिक : तिडकेनगर भागातील कर्मयोगी नगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी लाखाच्या दागिण्यावर डल्ला मारला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केविन जॉन डिकुन्हा (रा.ध्रुव अपा.कर्मयोगीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. केविन डिकुन्हा हे आपल्या कुटूंबियांसमवेत बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. २८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान कुटूंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घराचे लॅच तोडून बेडरूममधील कपाटातून सुमारे ९६ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
….
विहीतगावला ६५ हजाराची घरफोडी
नाशिक : विहीतगाव येथील मथुरारोड भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ६५ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात ५० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेखा विष्णू सोनवणे (रा.पांडूरंगनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे कुटूंबिय गेल्या गुरूवारी (दि.५) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप व लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून ५० हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि.७) उघडकीस आली. अधिक तपास उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.