शहरात चौघांची आत्महत्या
नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून सोमवारी (दि.१४) वेगवेगळया भागात राहणा-या चौघांनी आत्महत्या केली. त्यातील तीघांनी गळफास लावून तर एकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. मृतांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर,अंबड,पंचवटी आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सातपूर गावातील भंदूरे वाड्यात राहणा-या रोहिदास भीमराव वाघमारे (४७) यांनी रविवारी (दि.१३) मध्यरात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या आड्याला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. ही बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अक्षय वाघमारे यांनी दिलेल्या खबरीवरून सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुर्यवंशी करीत आहेत. दुसरी घटना सिडकोत घडली. रूपेश भटू कासार (४०) यांनी सोमवारी (दि.१४) आपल्या राहत्या घरातील किचमधील पंख्याच्या हुकाला ओढणी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी दिनेश कासार (रा.कामटवाडा) यांनी खबर दिल्याने अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत. तिसरी घटना जेलरोड भागात घडली. अमोल सतिष हिरे (२९ रा.भिमनगर,जेलरोड) या युवकाने सोमवारी रात्री अज्ञात कारणातून नाशिकरोड येथील पवन हॉटेल येथे गळफास लावून घेतला होता. त्यास तात्काळ बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वडघुले करीत आहेत. तर प्रविण बाळकृष्ण देवरे (२८ रा.गणेशनगर,अमृतधाम) या युवकाने सोमवारी (दि.१४) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
……..
तडीपार जेरबंद
नाशिक : शहर आणि जिह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केलेले असतांना विनापरवानगी शहरात वावर ठेवणा-या सराईतास पोलीसांनी जेरबंद केले. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक किसन चोथे (३२ रा. पवार मळा,अश्वमेधनगर पेठरोड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पंचवटी आणि म्हसरूळ परिसरातील गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमिवर चोथे यास गेल्या वर्षी शहर आणि जिह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच सोमवारी (दि.१४) तो पवार मळा येथील म्हसोबा मंदिर भागात येणार असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार युनिटचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावला असता संशयीत पोलीसांच्या जाळयात अडकला. म्हसोबा मंदिर येथील वडाच्या झाडाखाली तो येताच पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस तपासात तो विनापरवानगी राजरोसपणे शहरात वावरत असल्याचे पुढे आले असून याप्रकरणी पोलीस शिपाई मोतीराम चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.
……..
अपघातात तीन जखमी
नाशिक : शहरात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या दोन अपघातात तीन जण जखमी झाले. त्यात पती पत्नीचा समावेश असून, बेदारक चार चाकी वाहनाने दुचाकींना धडक दिल्याने दोन्ही अपघातात दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. याप्रकरणी आडगाव आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुह्यांची नोंद करण्यात आली आहे. अशोकामार्ग भागातील पांडूरंग नामदेव पाटोळे (रा.गुरूदत्त सोसा.गणेश नगर) हे गेल्या शुक्रवारी (दि.११) हनुमाननगर भागात गेले होते. दुचाकीने ते घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. हनुमाननगर चौकाकडून ते राजबिहारी स्कूल समोरील सर्व्हीस रोडने ते जत्रा हॉटेलच्या दिशेने प्रवास करीत असतांना पाठीमागून आलेल्या स्विफ्ट कारने (एमएच १५ जीएक्स ४६५९) दुचाकीस धडक दिली. या अपघातात पाटोळे जखमी झाले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत. दुसरा अपघात आडगाव मेडिकल कॉलेज लिंकरोडवर झाला. वृंदावननगर भागात राहणारे चेतन बनकर (रा.गजानन रो हाऊस,) व पत्नी अश्विनी बनकर हे दांम्पत्य शुक्रवारी (दि.११) रात्री म्हसरूळ गावाकडून आडगाव मेडिकल कॅलेज लिंकरोडने आपल्या घरी जात असतांना हा अपघात झाला. बनकर दांम्पत्य (एमएच ४१ पी ०६५६) या दुचाकीवर प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दांम्पत्य जखमी झाले असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार तुपलोंढे करीत आहेत.
……
पार्किंगमधून दुचाकीची चोरी
नाशिक : सोसायटीच्या पार्किंग मध्ये लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना शरयू पार्क भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय मच्छींद्र गोलाईत (रा.सत्यरूप अपा.शरयू पार्क आडगाव शिवार) यांनी तक्रार दाखल केली आहे. गोलाईत यांची दुचाकी एमएच ४१ बीए ७८३९ शनिवारी (दि.१२) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. अधिक तपास पोलीस नाईक वाघ करीत आहेत.
…….