नाशिक : मामा भाच्यास मारहाण करीत टोळक्याने दुकानात शिरून दरमहा खंडणीची मागणी केल्याची घटना उपनगर येथे घडली. या घटनेत टोळक्यातील एकाने दुकानात शिरून काऊंटर फोडून नुकसान केले असून त्यात महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खंडणीसह वेगवेगळया कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय चावरीया,सुरज सुनसुना,टिलक उर्फ बिट्या विनोद सौदे,ऋषीकेश चंद्रमोरे अशी खंडणी मागणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी चंदरलाल जमियतमल बोधवाणी (रा.सुर्यकमल सोसा.उपनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बोधवाणी यांचे परिसरातील साईबाबा मार्केट मध्ये जनता जनरल आणि बेकरी स्टोअर्स नावाचे दुकान आहे. २५ फेब्रुवारी रोजी रात्री बोधवाणी दुकान वाढवून दुचाकीने आपल्या घरी जात असतांना महाराष्ट्र हायस्कूल समोरील भिंतीवरून चावरीया व सुनसान यांनी त्यांना दगड फेकून मारल्याने त्यांच्या पायास दुखापत झाली. त्याच रात्री भाचा अमर वच्छाणी यांच्या घरात शिरून संशयीत सुनसुना आणि बिट्या सौदे यांनी शिवीगाळ करीत भाच्यास मारहाण केली. यावेळी बोधवाणी यांनी भाच्याच्या मारहाणी बाबत विचारणा केली असता संशयीतांनी आम्हीच तुझ्या पाहुण्याला मारहाण केली. तसेच आम्हाला दरमहा पाच हजार रूपये हप्ता दे नाही तर दुकान चालू देणार नाही अशी धमकी देवून निघून गेले. दुस-या दिवशी सायंकाळच्या सुमारास बोधवाणी यांच्या पत्नी व्यवसाय सांभाळत असतांना संशयीत चंद्रमोरे हा दुकानात आला. त्याने महिलेस शिवीगाळ व दमदाटी करीत हातातील कड्याने काऊंटरची काच फोडली. या घटनेत महिलेच्या हातास दुखापत झाली असून अदिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.