इच्छामणी मंदिराजवळ ७१ वर्षीय वृद्ध व्यक्तीने केली आत्महत्या
नाशिक – उपनगर येथील इच्छामणी मंदिराजवळ राहणाऱ्या ७१ वर्षीय वृद्ध व्यक्तीने घरात गळफास घेत आत्महत्या केली. हिरामण किशन जाधव असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जाधव यांनी रविवारी (दि.७) गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
…
दुचाकीस्वाराच्या डोक्यात मारहाण
नाशिक – महावीर कॉलनी समोरील परिसरात दोघा संशयितांनी दुचाकीस्वाराच्या डोक्यात मारहाण करीत पळ काढल्याची घटना रविवारी (दि.७) रात्री घडली. याप्रकरणी परवेज राजू शेख (३०, रा. कथडा) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरोधात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. परवेज हे दुचाकीवरुन मित्र फैजान शेख सोबत घरी जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार दोघा संशयितांनी परवेज यांच्या डोक्यात मारहाण करीत त्यांना दुचाकीसह खाली पाडले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस तपास करीत आहेत.
….
पोलिसांना बातमी दिली याचा राग आल्याने मारहाण
नाशिक – पोलिसांना बातमी दिली याचा राग आल्याने एकाने विक्रांत अनिल गांगुर्डे (२२, रा. आगर टाकळी) यास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.५) दुपारी घडली. याप्रकरणी विक्रांत गांगुर्डे याने मुंबईनाका पोलीस ठाण्यात संशयित चेतन गडवे (रा. आंबेडकरवाडी) याच्याविरोधात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. विक्रांत हा याच्यासोबत पेट्रोलपंपावर कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच या मारहाणीत विक्रांतकडील १५ हजार रुपयांचा मोबाइल स्वत:कडे ठेवून घेतला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस तपास करीत आहेत.
…
तडीपार केलेले असतानाही तलवार घेऊन दहशत, गुन्हा दाखल
नाशिक – तडीपार केलेले असतानाही तलवार घेऊन शहरात फिरणाऱ्या गुंडास इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुजाहिद उर्फ गोल्ड्या अफजल खान असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. उपनिरीक्षक प्रविण बाकले यांना मिळालेल्या माहितीनुसार गोल्ड्या तडीपार असतानाही शहरात फिरत असून तो तलवार घेऊन साईनाथ चौफुलीजवळ दहशत पसरवत असल्याचे समजले. त्यानुसार इंदिरानगर पोलिसांनी त्यास पकडून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.