इंटरनेट आणि युनो मोबाईल बँकीग व्दारे सव्वा लाख परस्पर काढले
नाशिक : शहरात सायबर गुह्यांमध्ये वाढ झाली असून मायलेकांच्या बँक खात्यातून परस्पर सव्वा लाख रूपये लांबविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एसबीआय बँकेच्या दोघांच्या खात्यातून ही रोकड आॅनलाईन काढण्यात आली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज रघुनाथ घोडे (रा.गुरूदेवदत्त सोसा.इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केले आहे. घोडे व त्यांच्या आईचे स्टेट बँक आॅफ इंडियात वेगवेगळी तीन बचत खाती आहेत. गेल्या मंगळवारी (दि.२४) अज्ञात भामट्यांनी इंटरनेट आणि युनो या मोबाईल बँकीग द्वारे अॅक्सेस घेवून वेगवेगळ्या खात्यातील सुमारे १ लाख १५ हजाराची रोकड परस्पर काढून घेतली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक माईनकर करीत आहेत.
………..
अतिक्रमण कारवाईस विरोध चौघांवर गुन्हा
नाशिक : अतिक्रमण काढत असतांना आरडा ओरड करून कारवाईस विरोध करणा-या चौघाविरोधात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात एका चायनिज गाडी चालकाचा समावेश आहे. मुस्तिकीन कुरेशी,फईम शेख,राबिया कुरेशी व अस्लम कुरेशी अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी मनपा कर्मचारी मदन हिरामण दोंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील ठिकठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे काम सुरू आहे. बुधवारी (दि.२५) पूर्व विभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये अतिक्रमण पथक पोलीस संरक्षणासह वडाळारोड येथील आयेशा मज्जीद जवळ गेले असता ही घटना घडली. चायनिज गाडी चालक मुस्तिकीन कुरेशी याच्यासह उर्वरीत संशयीतांनी या कारवाईवर आक्षेप नोंदवित विरोध केला. यावेळी संशयीतांनी आरडाओरड करून कोवीड १९ नियमावली आदेशाचे भंग करून जाणा-या येणा-यांची गर्दी जमा केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.
……..
बांधकाम कामगाराची आत्महत्या
नाशिक : बांधकाम साईटवर काम करणा-या ४५ वर्षीय परजिह्यातील कामगाराने आत्महत्या केल्याची घटना तपोवन रोड परिसरात घडली. सदर इसमाने अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. कृष्णा शिवचरण पाताडे (४५ मुळ रा.गोवठा जि.गोंदीया हल्ली ओली हाईटस साईट तपोवनरोड) असे आत्महत्या करणा-या कामगाराचे नाव आहे. तपोवन रोड भागात सुरू असलेल्या ओली हाईटस या बांधकाम साईटवरील तो कामगार असून त्याच ठिकाणी वास्तव्यास आहे. बुधवारी (दि.२५) मृत पाताडे याने अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बल्लीला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार भोज करीत आहेत.
…..
तीन दुचाकींची चोरी
नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून नुकत्याच वेगवेगळया ठिकाणी पार्क करून ठेवलेल्या तीन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी भद्रकाली पंचवटी आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टाकळीरोड भागात राहणारे मनिष रविंद्र झोपे (रा.शितकमल धवलकर सोसा.) यांची पल्सर एमएच १५ एफएक्स ८९४१ रविवारी (दि.२२) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार दळवी करीत आहेत. दुसरी घटना मालवीय चौकात घडली. याप्रकरणी प्रशांत अरूण चौधरी (रा.काठेगल्ली,द्वारका) यांनी तक्रार दाखल केली आहे. चौधरी गेल्या बुधवारी (दि.११) मालवीय चौकात गेले होते. मित्र कल्पेश कर्डीले यांच्या मालकीची एमएच १५ एई ४४७८ स्प्लेंडर दुचाकी त्यांनी पंचरत्न हॉटेलच्या बोळीत पार्क केली असता चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सांगळे करीत आहेत.तर तिडकेनगर येथे राहणारे दयाराम भिमदेव जाधव (रा.शिवसुंदर अपा.) यांची पल्सर एमएच १५जीएम ५५०१ गेल्या गुरूवारी (दि.१२) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत.