नाशिक : गर्भपात करण्यासाठी मदतीस धावून आलेल्या नातेवाईक तरूणास तुझेच पाप असल्याचा आरोप केल्याने त्याने अल्पवयीन युवतीचा निर्घुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांनी अवघ्या तीन दिवसात या गुह्याचा उलगडा केला आहे. मृत मुलीची ओळख पटवीत पोलीसांनी तिच्या नातेवाईक असलेल्या मारेक-यास बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
दानिश जावेद कुरेशी (२० रा.लोहारवाडा,देवळाली गाव) असे मुलीचा खून करणा-या संशयीताचे नाव आहे. तपोवनातील मारूती वेफर्स समोरील कर्मा गॅलेक्सी या सोसायटीच्या पाठीमागील निर्जनस्थळ असलेल्या मोकळया भूखंडावर गेल्या शनिवारी (दि.१२) अनोळखी युवतीचा मृतदेह मिळून आला होता. खूनाच्या घटनेनंतर सात ते आठ दिवसांनी परिसरात दुर्गंधी पसरल्याने या घटनेचा उलगडा झाला होता. शवविच्छेदनात अज्ञात मारेक-यांनी युवतीचा गळा आवळून डोक्यात दगड टाकून खून केल्याचे पुढे आल्याने भद्रकाली पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशी आली घटना उघडकीस
शहर गुन्हे शाखा आणि भद्रकाली पोलीस संयुक्तरित्या तपास करीत असतांना ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी मिळालेल्या सोनोग्राफीच्या फाईलच्या आधारे तिन दिवस तपास करून पोलीसांनी अल्पवयीन युवतीची ओळख पटवित संशयीतास अटक केली असून त्याने गुह्याची कबुली दिली आहे. झैनब शाम उर्फ जाकीर कुरेशी (१७ रा.देवळाली गाव) असे मृत मुलीचे नाव आहे.
धमकी दिल्याने ही घटना घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहिती वरून झैनब कुरेशी तीन महिन्यांची गर्भवती होती. गर्भपात करण्यासाठी तिने नातेवाईक असलेल्या दानिशकडे आग्रह धरला होता. तू पती बनून मला दवाखान्यात नेवून गर्भपात करून दे असा तगादा लावला होता. मात्र दानिश टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच तिने तू दवाखान्यात आला नाहीस तर मी तुझेच नाव घेईन अशी धमकी दिल्याने ही घटना घडली.
डोक्यात दगड टाकून केले ठार
भेदरलेल्या दानिशने तिला सोबत घेत शहरातील एका सोनोग्राफी सेंटरला भेट देत तपासणी केली. झैनब तिन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले परंतू अल्पवयीन असल्याने वैद्यकीय सुत्रांनी गर्भपात करण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांच्या पायाखालची वाळू सरकली. यातच झैनब कडून ब्लॅकमेलींग वाढल्याने अखेर दानिशने शक्कल लढविली. तपोवनात एक वैद्य असून तो जडीबुटीच्या माध्यमातून गर्भपात करून देत असल्याचे त्याने खोटे सांगितले. झैनबनेही त्यास संमत्ती दर्शविल्याने शनिवार (दि.५) रोजी पहाटे दोघे दुचाकीवर तपोवनात पोहचले. तेथे दानिशने तिचा गळा आवळून ठार केले. तसेच ओळख पटू नये म्हणून तिच्या डोक्यात वजनी दगड टाकण्यात आला.
मृतदेह कर्मा गॅलेक्सी पाठीमागील निर्जन भूखंडावर फेकून पसार
दगड टाकल्यानंतर त्याने मुलीचा मृतदेह कर्मा गॅलेक्सी पाठीमागील निर्जन भूखंडावर फेकून पसार झाला. घटनास्थळी मिळालेल्या सोनोग्राफी फाईल्सच्या आधारे मिळालेल्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषणाद्वारे मुलीचे ओळख पटवून संशयीतास बेड्या ठोकल्या. संशयीतास भद्रकाली पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून ही कारवाई उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चे निरीक्षक आनंद वाघ,सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी,रघुनाथ शेगर,हवालदार रविंद्र बागुल,वसंत पांडव,नाझीम पठाण,पोलीस नाईक दिलीप मोंढे,गणेश वडजे,विशाल देवरे,विशाल काठे,मोतीराम चव्हाण तसेच भद्रकालीचे सहाय्यक निरीक्षक मोहिते,शिपाई सचिन म्हसदे आदींच्या पथकाने केली.