नाशिक – शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आजपासून जिल्हयामध्ये कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोध मोहिम सुरु करण्यात आली. जिल्हा परिषदेत आज या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ पी.डी. गांडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग विभाग डॉ रवींद्र चौधरी, सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शैलेश निकम नाशिक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. तुरावली देशमुख, व सर्व तालुका आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचे उपस्थितीत करण्यात आले
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य व शिक्षण सभापती सुरेखा दराडे यांचे मार्गदर्शनानुसार जिल्हयात सदरची मोहिम राबविण्यात येणार आहे.कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांना लवकरात लवकर ओळखून उपचाराखालीआणणे गरजेचे असल्याने या मोहिमेत अशा रुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. नाशिक जिल्हयात ४३ लक्ष ४६ हजार १३५ एवढी लोकसंख्या आहे. ग्रामीण भागात 37 लक्ष 10 हजार, ३७५ तर शहरी भागामध्ये ६ लक्ष ३५ हजार ७९० एवढी लोकसंख्या आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ८ लक्ष ६९ हजार २२७ कुटुंबांना भेट दिली जाणार आहे यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ३८२० टीम तयार करण्यात आल्या असून प्रत्येक घरी भेट देऊन घरातील व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये संशयित रुग्णांची माहिती घेऊन त्यांना योग्य पद्धतीने तपासणी करून उपचार देण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्हयात सदरची मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी या मोहिमेसाठी येणाऱ्या आरोग्य सेवक आरोग्यसेविका यांना नागरिकांनी सहकार्य करुन आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे व खरी माहिती द्यावी व तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आवाहन केले आहे.