नाशिक – नाशिक शहरातील आकाशवाणी भाजी मार्केटचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असून भाजी विक्रेते व महानगरपालिका यांच्यात वाद अधिक चिघळला होता. यासंदर्भात राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे महापलिका आयुक्त व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सदर बैठकीत न्यायालयीन आदेशाचे पालन करून आकाशवाणी भाजी मार्केट आहे त्याच ठिकाणी सुरु ठेवून याठिकाणी पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव व सबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आज भुजबळ फार्म कार्यालय येथे झालेल्या बैठकीत नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ, महापलिका आयुक्त कैलास जाधव, उपायुक्त विजय पगार, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, नगर रचना विभागाचे कार्यकारी अभियंता राजू आहेर राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टीचे संजय खैरनार, किशोर शिरसाठ यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नाशिक शहरातील आकाशवाणी भाजी मार्केटच्या प्रश्नांवर भाजी विक्रेत्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी काढण्यात यावा अशी मागणी केली होती. याबाबत आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपा आयुक्तांसमवेत अधिकाऱ्यांशी बैठक बोलावली होती. सदर बैठकीत आकाशवाणी भाजी मार्केट येथील भाजी विक्रेत्यांना आहे त्याच ठिकाणी भाजी विकण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच येथील पार्किंगच्या प्रश्नासंदर्भात नियोजन करून महानगरपालिकेकडून स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करून देण्यात यावी असे निर्देश महापलिका आयुक्त कैलास जाधव यांना दिले आहे. त्यामुळे आकाशवाणी भाजी मार्केटचा प्रश्न निकाली निघाला आहे.