अवेळी नातेवाईकाच्या घरी जाऊन दरवाजा जोरात वाजवल्यामुळे मारहाण
नाशिक : दरवाजा एवढ्या जोरात का वाजवतो, ही काय येण्याची वेळ आहे का? असे म्हणत नातेवाईकाने एकास शिवीगाळ करत बाबुंने मारहाण केली. याप्रकरणी बसरत रामदास ठाकरे (रा. दिवा पश्चिम, ठाणे) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बाळू खंडू आहिरे (रा. सहवासनगर, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व संशयित एकमेकांचे नातेवाईक आहेत. १७ डिसेंबर रोजी रात्री एक वाजता फिर्यादी बसरत ठाकरे हे संशयित बाळू आहिरे यांच्या घरी गेले व घराचा दरवाजा वाजवला. त्यावर संशयित आहिरे याने एवढ्या जोरोने दरवाजा का वाजवला ? ही काय येण्याची वेळ आहे का ? अशी विचारणा शिवीगाळ केली व ढकलून दिले. तसेच बाजूला पडलेला बांबू डोक्यात मारून दुखापत केली. याप्रकरणी हवालदार केशव आडके करत आहे.
———-
चोरट्याने १८ हजार रुपये किंमतीचे कपडे चोरून नेले
नाशिक : दुकानात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने १८ हजार रुपये किंमतीचे कपडे चोरून नेले. याप्रकरणी नितीन माणिक कुकरेजा (रा. वडनेर रोड) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी कुकरेजा यांचे मेनरोडला कपड्याचे दुकान आहे. दुकानाचा एक भाग पडलेला असून त्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरटा १४ ते १७ डिसेंबर दरम्यान दुकाना घुसला व १० हजार रुपये किमतीचे कपडे, ५ हजार रुपये किंमतीचा टीव्ही, ३ हजार रुपये किंमतीचा फॅन असा १८ हजार रुपये किंमतीचा माल चोरून नेला. याप्रकरणी हवालदार एन. बी. जाधव तपास करत आहे.
——-
पार्किंग केलेली मोटारसायकल चोरीला
नाशिक : अपार्टमेंटमध्ये पार्किंग केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी चेतन सुधीर जाधव (रा. रामकृष्ण भक्ती अपार्टमेंट, महात्मानगर) याने गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चेतन याने त्याची मोटारसायकल क्रं. (एमएच १६ एएस ६१७८) आपर्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली.
———
मागील भांडणाची कुरापत काढत धारदार वस्तूने हल्ला
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढत एकावर धारदार वस्तूने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पवन विष्णू आव्हाड (रा. मोरे मळा, जेलरोड) याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कार्तीक नारायण पालकर, गणेश यादव (पुर्ण नाव माहिती नाही, रा. मोरे मळा) अशी संशयितांचे नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी पवन हा भगवती चौक येथे एका अंडाभुर्जींच्या गाड्यावर बसला असताना संशयित कार्तीक व गणेश हे दोघेजण तेथे आले व त्यांनी मागील भांडणाची कुरापत काढत फिर्यादी पवनवर धारदार वस्तूने वार केले. याप्रकरणी हवालदार एन. एम. वडघुले तपास करत आहे.
———
महिलेच्या इच्छेविरुद्ध टेक्स्ट व व्हाटॅ्सअॅप मेसेज,गुन्हा दाखल
नाशिक : महिलेच्या इच्छेविरुद्ध टेक्स्ट व व्हाटॅ्सअॅप मेसेज पाठवून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार इरशाद (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरुद्ध भादवि कलम ३५४ (ड) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
——-
शहरात तिघांच्या आत्महत्या
नाशिक : विविध कारणांतून शहरात तीन जणांनी आत्महत्या केल्या. याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना गोरेवाडी परिसरात घडली. येथील भाडेकरूने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मंगेश शंकर हिवराळे (वय ३४, रा. गोरेवाडी) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. १६ डिसेंबर रोजी रात्री मंगेश याने गळफास घेतला. त्यामुळे घरमालक दीपक उगले याने त्यास उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिका-यांनी मंगेशची तपासणी करून त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. येथील भिवा नामदेव बोरोडे (वय ७१, रा. सुमन हॉस्पिटल जवळ) यांनी आजारपणाला कंटाळून खिडकीच्या गजाला दोरी बांधून गळफास घेतला. तिस-या घटनेप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अविनाश रवी राऊत (वय ३०, रा. वडनेर धुमाळ पंपींग रोड, सह्याद्री नगर) याने गुरुवार (दि. १७) घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेतला.