नाशिक : अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीची वाट अडवून धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणात न्यायालयाने एकास पोस्को (बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनीयम) कायद्यान्वये तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ही घटना २०१६ मध्ये सीबीएस परिसरातील आदर्श शाळा भागात घडली होती. हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.डी.देशमुख यांच्या कोर्टात चालला. जुनेद तबारक चौधरी (२३ रा.काठे गल्ली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीचा पाठलाग करायचा. १५ फेब्रुवारी २०१६ दुपारी शाळा सुटल्याने विद्यार्थीनी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर पडत असल्याने आरोपीने तिला गाठले. यावेळी त्याने रस्ता अडवित फ्रेंण्डशिप करायची आहे. एकांतात भेट असे म्हणून मुलीचा विनयभंग केला. यावेळी त्याने माझे ऐकले नाही तर तुला उचलून घेवून जाईन. तसेच यापूर्वी मी खून केलेला आहे. तू मला ओळखले नाही अशी धमकी दिली होती. मुलीने कुटूंबियांकडे आपबिती कथन केल्याने याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंग,धमकी आणि पोस्को (बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनीयम) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन महिला सहाय्यक निरीक्षक एम.एम.नाईक यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. सरकार पक्षाकडून अॅड दीपशिखा भिडे यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस नाईक टी.ई लभडे व महिला शिपाई व्ही.एस.सोनवणे यांनी सहाय्य केले. या खटल्यात फिर्यादी,साक्षीदार आणि पंच यांची साक्ष आणि तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थीतीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने पोस्को कायद्यान्वये तीन वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रूपये दंड आणि भादवी कलम ३४१ अन्वये एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.