अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या कलाशिक्षकास ४ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा
नाशिक : चित्रकलेचा अभ्यास करुन घेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या कलाशिक्षकास जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ वर्ष सक्तमजूरी व १० हजार रुपयांची शिक्षा सुनावली. ही घटना शहरातील फावडे लेन भागात घडली होती.याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चंद्रकांत वामन भालेराव (६९, रा. सुरारा कॉम्प्लेक्स, फावडे लेन) असे आरोपीचे नाव आहे. पिडीत अल्पवयीन मुलगी चित्रकलेच्या क्लाससाठी फावडे लेन येथे जात होती. २६ ते २८ जुलै २०१६ दरम्यान,आरोपी भालेराव याने पीडितेचा अभ्यास करुन घेण्याच्या बहाण्याने विनयभंग केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोसह गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी तपास करुन न्यायालयात दोेषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे आर. एम. कोतवाल यांनी युक्तीवाद केला. त्यानुसार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी आरोपी भालेराव यास चार वर्ष सक्तमजूरी व दंड ठोठावला आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार ए. एस. पवार यांनी कामकाज पाहिले.
………
तडिपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक : शहर व जिह्यातून हद्दपार कारवाई केलेली असतांना राजरोसपणे शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
आफताब उर्फ रम्मी नजीर शेख (३२, रा. बागवानपुरा) असे अटक करण्यात आलेल्या तडीपाराचे नाव आहे. जुने नाशिक परिसरातील गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमिवर भद्रकाली पोलीसांनी त्याच्यावर तडिपारीची कारवाई केली आहे. दोन वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच होता. मंगळवारी (दि.२३) युनिट एकचे कर्मचारी काळू बेंडकुळे, प्रविण कोकाटे, महेश साळुंके, गौरव खांडरे, राम बर्डे, समाधान पवार आदींचे गस्ती पथक गस्त घालत असतांना खबºया कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हॉटेल दरबार पाठीमागील डेपोच्या मोकळ््या आवारात संशयीतास बेड्या ठोकण्यात आल्या. गेल्या तीन महिन्यात युनिट १ च्या पथकाने शहरात वावर ठेवणाºया चार जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
…..
सिमेंट ठेकेदारास टोळक्याने लुटल्याची घटना
नाशिक : सिमेंट ठेकेदारास टोळक्याने लुटल्याची घटना मालधक्कारोड भागात घडली. टोळीतील म्होरक्यास जामिन देण्यासाठी दहा हजार रूपयांची मागणी करीत कोयत्याने हा हल्ला केला. यात जखमी ठेकेदाराची सोनसाखळी पळविली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयीतांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ऋषीकेश उर्फ भारत अशोक निकम व बडे पप्पू पठाण (रा.गुलाबवाडी,मालधक्का) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सचिन ओमप्रकाश सोमाणी (रा.जगतापमळा,ना.रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोमाणी सिमेंट व्यवसाचे ठेकेदार असून त्यांचे मालधक्का रोडवर कार्यालय आहे. सोमवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास ते आपल्या कार्यालयात बसलेले असतांना चौघांचे टोळके तेथे आले. संशयीतांनी सोमाणी यांना गाठून सागर म्हस्के या म्होरक्यास जामिन देण्यासाठी दहा हजार रूपयांची मागणी केली. सोमाणी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संशयीत टोळक्यातील संतप्त एकाने कमरेला लावलेला कोयता काढून सोमाणी यांच्या डाव्या हातावर वार करून जखमी केले. तर दुसºयाने त्यांच्या गळयातील सोन्याची सुमारे ८० हजार रूपये किमतीची सोनसाखळी बळजबरीने ओरबाडून घडली. या घटनेत उर्वरीत साथीदारांनी पोलीसात गेलास तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत टोळक्याने पोबारा केला. पोलीसांनी तात्काळ दोघांना अटक केली असून त्यांना रविवार (दि.२८) पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक विलास शेळके करीत आहेत.