नाशिक : पूर्ववैमनस्यातून रिक्षाचालकाचे अपहरण करून टोळक्याने बेदम मारहाण करीत प्राणघातक हल्ला केल्याची घटना महामार्गावरील छान हॉटेल परिसरात घडली. या मारहाणीत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या जबाबावरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात अपहरण आणि जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणा-यांमध्ये दोघा सराईत गुन्हेगारांचा समावेश असून पोलीसांनी पाच जणांना अटक केली असून एक संशयीत फरार आहे.
अरूण कांबळे,रणजित कांबळे (रा.दोघे राजदूत हॉटेल मागील झोपडपट्टी),विनायक गायकवाड,महादेव सोळंके आणि आकाश पवार अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे असून जगदिश गायकवाड नामक त्यांचा साथीदार अद्याप फरार आहे. याप्रकरणी किरण सुरेश सोनवणे (२५ रा.गोदावरी सोसा.नारायण बापू नगर,जेलरोड) या रिक्षाचालकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे बुधवारी (दि.२७) रात्री राजदूत हॉटेल येथील रिक्षा थांब्यावर प्रवाश्यांच्या प्रतिक्षेत असतांना पोलीस रेकॉर्डवरील कांबळे बंधूसह टोळक्याने त्यास गाठले. यावेळी टोळक्याने जुन्या वादातून कुरापत काढून शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर संतप्त टोळक्याने सोनवणे यास बळजबरीने रिक्षात बसवून मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील महामार्गास लागून असलेल्या छान हॉटेल भागात नेले. या ठिकाणी त्यास लाथाबुक्यांनी व लाठ्या काठ्यांनी मारहाण करीत रिक्षाद्वारे त्यास फरफटत नेवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सोनवणे हा रिक्षाचालक जखमी झाला असून त्याच्या जबाबावरून सहा जणांच्या टोळक्याविरूध्द अपहरण आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रविण शिंदे करीत आहेत.