नाशिक – पंचवटी परिसरातील दागिन्याचे दुकान फोडून सोन्याचे अडीच तोळे वजनाचे दागिने चोरणाऱ्यास अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. शाह यांनी अडीच वर्षे सक्तमजूरी आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हसन हमजा कुट्टी (४०, रा. अश्वमेध नगर, पेठरोड) असे या आरोपीचे नाव आहे.
अमृतधाम येथील साईनगर परिसरातील एकविरा अलंकार दुकानात १८ ते १९ मार्च २०१८ रोजी चोरट्याने घरफोडी करुन अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले होेते. याप्रकरणी गौरव अरुण विसपुते (३३, रा. साईनगर) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली. याप्रकरणी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे यांनी तपास करून आरोपीस पकडले. तसेच त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे ए. बी. कारंडे यांनी युक्तीवाद केला. त्यात साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हसन कुट्टी यास घरफोडी केल्याप्रकरणी दोषी मानले. तसेच त्यास अडीच वर्षे सक्तमजूरीव व दंड ठोठावला. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार डी. एस. काकड व महिला पोलीस शिपाई एम. ए. सोनवणे यांनी कामकाज पाहिले.