नाशिक : नाशिक जिल्ह्यातील द्राक्षपंढरीतील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात येऊन ठेपल्याने दराला चांगलाच गोडवा आला आहे. स्थानिकसह निर्यातक्षम द्राक्षांच्या दरात प्रतिकिलो १५ रुपयांची वाढ झाली आहे. देशांतर्गत द्राक्षाला सरासरी ४० रुपये, तर निर्यातक्षम द्राक्षाला ६० रुपये असा दर मिळू लागल्याने हंगामाचा शेवट द्राक्ष हंगाम साखरेप्रमाणे गोड होईल, असे सुखद चित्र आहे. गेल्या वर्षीची सरासरी ओलांडत आतापर्यंत तब्बल साडेसात हजार कंटेनरमधून सुमारे एक लाखाहून अधिक टन द्राक्ष सातासमुद्रापार पोचले आहे.
निर्यातक्षम द्राक्ष पिकविणाऱ्या निफाडची ख्याती सातासमुद्रापार पोहचली आहे. निर्यातक्षम द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जाणारा व कृषी वैभवाची नांदी जपणाऱ्या निफाड तालुक्यात द्राक्ष हंगामास जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून प्रारंभ होतो.यंदा दराअभावी द्राक्ष हंगामाचा श्रीगणेशा काहीसा निराशाजनक झाला. त्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने द्राक्ष उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळले गेले. अवघ्या २५ ते २८ रुपये प्रतिकिलो दराने द्राक्षांचे सौदे होत होते. परिपक्व होऊन चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने मिळेल त्या भावात शेतकऱ्यांनी बागा खाली करून घेतल्या. परिणामी, उत्पादनखर्चही मिळाला नाही. मात्र द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात येऊन ठेपल्याने दराला चांगलाच गोडवा आला आहे.
स्थानिकसह निर्यातक्षम द्राक्षांच्या दरात प्रतिकिलो १५ रुपयांची वाढ झाली आहे. देशांतर्गत द्राक्षाला सरासरी ४० रुपये, तर निर्यातक्षम द्राक्षाला ६० रुपये असा दर मिळू लागल्याने चिली, दक्षिण आफ्रिका या देशांशी स्पर्धा करत भारतीय द्राक्षांनी युरोप, रशियासह जगभरातील बाजारपेठेत हुकूमत गाजवली आहे. नेदरलँड, यूके, जर्मनी आदींसह भारतातून आजपर्यंत साडेसात हजार कंटेनरमधून एक लाख टन द्राक्ष सातासमुद्रापार पोचले आहेत. गेल्या वर्षापेक्षा निर्यात सातशे कंटनेरने अधिक असून, आठ हजार टन द्राक्ष अधिक निर्यात झाले आहेत. इजिप्तचा हंगाम सुरू होण्यास पंधरा दिवस उशीर असल्याने भारतीय द्राक्षांना मागणी वाढली आहे. त्यातच नाशिकमधील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने पुरवठ्यापेक्षा मागणी वाढली आहे. त्या मुळे निर्यातक्षम द्राक्षांचे दर ५५ ते ६० रुपये किलोपर्यंत पोचले आहेत.
दर वधारले
द्राक्ष हंगाम अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपल्याने द्राक्ष दरात दहा ते १५ रुपये प्रतिकिलो मागे तेजी आली आहे. जिल्ह्यातून दिवसाकाठी जिल्ह्यातून २६० ते ३०० ट्रकमधून पाच हजार टनाहून अधिक द्राक्ष दररोज उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, उत्तरांचल या राज्यांत पोचत आहे. द्राक्षांच्या प्रतवारी नुसार उत्पादकांना तातडीने पेमेंट वाटप केले जात आहे.
संतोष निकम, द्राक्ष व्यापारी पिंपळगाव बसवंत