बंगळुरू – महाराष्ट्रातील कोविड -१९ च्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर कोविड -१९ निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र ७२ तासापेक्षा जुने नसावे.
आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, प्रवासी वाहनात बसताना विमान कंपनीचे कर्मचारी या अहवालाची खात्री करतील. या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि हॉटेल, रिसॉर्ट्स आणि इतर ठिकाणी थांबलेल्या लोकांना आरटी-पीसीआर तपासणीचे निगेटिव्ह अहवाल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल आणि हे प्रमाणपत्र ७२ तासापेक्षा जुने असू नये, असा नियम करण्यात आला आहे. नाशिकहून विमानाने बेळगाव किंवा बंगळूरूला जाता असल्यास काळजी घ्यावी. ओझर विमातळावरुन सध्या बेळगाव आणि बंगळुरू या शहरांसाठी सेवा सुरू आहे. त्याला उत्तम प्रतिसाद आहे. त्यामुळे या सर्व प्रवाशांना आता हे प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागणार आहे.