नाशिक – नाशिक विमानसेवेसाठी खुषखबर आहे. विमानसेवा देणाऱ्या स्पाईसजेट या आघाडीच्या कंपनीद्वारे आता सुरत या शहरासाठी सेवा सुरु होणार आहे. स्पाईसजेटने यापूर्वी नाशिक-हैदराबाद ही सेवा स्थगित केली आहे. मात्र, ती सुद्धा सुरु करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळेच येत्या २८ मार्चपासून हैदराबाद-नाशिक-सुरत ही नवी सेवा सुरु केली जाणार आहे. त्यामुळे व्यवसाय़ व उद्योगासाठी ख्यात असलेले सुरत हे शहर नाशिकशी जोडले जाणार आहे. त्याचा नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे.
सद्यस्थितीत ओझर येथील विमानतळावरुन स्पाईसजेटची नाशिक-नवी दिल्ली आणि नाशिक-बंगळुरु, ट्रुजेटची नाशिक-अहमदाबाद, अलायन्स एअरची नाशिक-पुणे, नाशिक-अहमदाबाद आणि नाशिक-हैदराबाद या सेवा सुरू आहेत. स्पाईसजेट एप्रिल महिन्यापासून नाशिक ते कोलकाता ही थेट विमानसेवा देणार आहे. तसेच, नाशिक-दिल्ली ही सेवाही ६ दिवस होणार आहे. त्यात आता स्पाईसजेटने हैदराबाद-नाशिक-सुरत या सेवेची घोषणा केल्याने नाशिकच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.