येवला – साहेब,आपलेच सरकार अनुदानाचा निर्णय घेईल..पण गेल्या १५ ते २० वर्षापासून आम्ही विनावेतन ज्ञानदान करतोय..आता तरी आम्हांला न्याय द्या आणि अनुदानाचा निर्णय लांबवून उपाशीपोटी ठेऊ नका अशी आर्त साद शिक्षक प्रतिनिधींनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना घातली. यावर थोरात यांनी,शाळांच्या अनुदानाच्या बाबतीत मी जोरदार प्रयत्न करीत आहे. प्रचलित नियमाने अनुदान मिळावे यासाठी मी अगोदर पासून आग्रही आहे. यावर शासन नक्कीच निर्णय घेईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
संगमनेर येथे थोरात यांची स्वाभिमानी शिक्षक संघटना,राज्य उच्च माध्यमिक व कनिष्ठ महविद्यालय कृती संघटना,कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती,मुख्याध्यपक संघ आदी शिक्षक संघटनेच्या नाशिक व राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानी भेट घेत सविस्तरपणे चर्चा केली. यावेळी विभागाचे पदवीधर आमदार डॉ.सुधीर तांबे हेही उपस्थित होते.
संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यानी आपल्या १३ सप्टेंबर २०१९ मधील मुद्यासह प्रामुख्याने १५ नोव्हेंबर २०११ तसेच २६ जून २०१४ च्या शासननिर्णयाप्रमाणे सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळा व ज्यू.कॉलेजांना अनुदान वितरित करण्याचे सुत्र लागु करणे गरजेचे असल्याचे पुराव्यासह निदर्शनास आणून दिले.
यावेळी थोरात म्हणाले, शाळांच्या अनुदानाच्या बाबतीत मी माझ्यातर्फे जोरदार प्रयत्न करीत आहे. प्रचलितने अनुदान मिळावे यासाठी मी अगोदर पासून आग्रही असून उपाशीपोटी काम करणाऱ्या अन अडचणीत शिकविणारा शिक्षकाला पूर्ण वेतन मिळायलाच पाहिजे. यासंदर्भात निर्णयासाठी केलेल्या उपसमितीमध्ये अजून इतर दोन पदांची नावे आलेली नाहीत. समिती पूर्ण स्थापित झाल्यावर तात्काळ कार्यवाही केली जाईल. अनुदानाच्या प्रश्ना बाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडसह आम्ही सर्व आग्रही आहोत असेही त्यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशन २०१९ मध्ये मी टप्पा पद्धतीने अनुदान वितरित केले जाईल असे सांगितले होते. ते परिपूर्तीकडे नेण्याचा माझा उपसमितीच्या माध्यमातून प्रयत्न राहिल असेही ते म्हणाले. यावेळी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नाशिक मुख्याध्यापक संघाचे एस.बी.देशमुख, शिक्षक नेते के.पी.पाटील,भारत भामरे, कृती समितीचे नेते गोरख कुळधर,सोमनाथ जगदाळे,अशोक जाधव,उच्च माध्यमिक कृती संघटनेचे राज्याध्यक्ष दीपक कुलकर्णी,राज्य सचिव अनिल परदेशी,प्रवीण भुतेकर,कर्तारसिंग ठाकूर,दिनेश पाटील,गुलाब साळुंखे,निलेश गांगुर्डे,महेंद्र बच्छाव,पी. एन. तायडे,विशाल आव्हाड,सुरेश कापूरे,प्रमोद रुपवते, संदीप बाविस्कर आदी उपस्थित होते.
अनुदानाच्या प्रतीक्षेत ५० हजारांवर शिक्षक
शासनाने प्रचलित पद्धतीने अनुदान दिले तर आज वयाची चाळीशी उलटलेले शिक्षकांना वेळेत पूर्ण वेतन मिळणर आहे.आजही अनुदानाच्या प्रतीक्षेत ५० हजारांवर शिक्षक वर्षानुवर्षे अध्यापन करत असून त्यांना न्याय द्या,उपाशी ठेऊ नका हि मागणी आम्ही सर्वांनी केली.शासन अनुदानाच्या निर्णयावर सकारात्मक असल्याचे सर्वच मंत्रीमहोदय सांगत आहेत.आता ठोस निर्णय घेऊन अनुदान खात्यावर टाकून आम्हांला न्याय मिळावा.”
–गोरख कुळधर,माध्यमिक शिक्षक संघटना नेते,येवला.