नाशिक – नाशिकरोड परिसरातील रहिवाशांसाठी गुडन्यूज आहे. पुढील वर्षी या भागातील नागरिकांना महापालिकेच्यावतीने शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. तशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे. या भागातील जलवाहिन्या बदलल्या जाणार असून त्यासाठीची आर्थिक तरतूदही महापालिकेने केली आहे.
२० वर्षे जुन्या जलवाहिन्या
महापौर कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक रोड विभागातील नागरिकांना पिण्याचे पाणी हे दारणा नदीतील रॉ वॉटर चेहेडी पंपिंग स्टेशन येथून उचलून शुद्धीकरण करून पुरविले जाते. चेहेडी पंपिंग स्टेशन हे दारणा व वालदेवी नदीच्या संगमाजवळ आहे. परंतु वालदेवी मधील साचलेल्या पाण्यात अळ्या तयार होऊन पाणी उचलण्याच्या ठिकाणापर्यंत येतात. त्यामुळे नाशिकरोडवासियांना अळ्या मिश्रित पाण्याचा पुरवठा होता. याबाबत स्थानिक नगरसेवकांनी तक्रार केल्यानंतर गेल्या महिन्यात महापौरांनी या भागाचा दौरा केला. या भागातील जलवाहिन्या या २० वर्षे जुन्या आहेत.
हे आहेत पर्याय
पुढील तीस वर्षांचे नियोजन गृहीत धरून सदर पाणीपुरवठा पाईपलाईनचा अभ्यास तांत्रिक सल्लागार संचालक वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट, मुंबई यांनी केला. त्यांनी दोन पर्याय सुचविले. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र पर्यंत ९०० मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन टाकणे. आणि १२ बंगला जलशुद्धीकरण केंद्र ते गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईप लाईन टाकणे.
निधीची तरतूद
प्रथम टप्प्यातील गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रा पर्यंत ९०० मिलिमीटर व्यासाची डीआय पाईपलाईन याकरिता १९ कोटी रुपये लागणार आहेत. या प्रस्तावास नुकत्याच झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली. या कामाचा खर्च हा २०२-२१ मध्ये जलदाय व्यवस्था प्रकल्प याअंतर्गत ५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित खर्च हा २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. प्रशासनाने तातडीने ई निविदा मागवून हे काम करावे, असे पत्र महापौरांनी आयुक्त कैलास जाधव यांना दिले आहे.