नाशिकरोड – गुंतवणूकदारांची एक कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्युचर ट्रेडिंग सोल्युशन या फर्ममध्ये गुंतवणूक केलेली असताना परताव्यापोटी फ्युचर फोरच्युन या नवीन फर्मचा चेक देऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
आशुतोष पंढरीनाथ आढाव (४९, कर्नल, ऑफिसर कॉलनी, गोस्वामी एनक्लेव्ह, आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड) यांनी या प्रकरणात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी अरविंद ग्यानशंकर सिंग (४२, कृष्णवंदन रो हाऊस, गुलमोहर कॉलनी, आर्टिलरी सेंटररोड), राजेशकुमार विजयकुमार सिंग (३८, प्लाट नं. ५८, साईश्रध्दा अपार्टमेन्ट, लोखंडेमळा, जेलरोड) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे फिर्यादीत
आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी व गुंतवणुकदारांना फ्युचर ट्रेडिंग सोल्युशन या कंपनीबाबत खोटी माहिती देऊन फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांकडून विविध रकमा स्वीकारल्या. त्या बदल्यात फिर्यादी व त्यांच्या सहका-यांना सामंजस्य करार आणि सिक्युरिटी चेक्स देण्यात आले. मात्र, करारनाम्याप्रमाणे परतावा दिला नाही.
नवीन फर्मचा चेक देऊन फसवणूक केली
फिर्यादी व त्यांच्या सहका-यांनी फ्युचर ट्रेडिंग सोल्युशन या फर्ममध्ये गुंतवणूक केलेली असताना परताव्यापोटी फ्युचर फोरच्युन या नवीन फर्मचा चेक देऊन फसवणूक केली. आजपर्यंत फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांचा एक कोटी पाच लाख ७५ हजार रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असे तपासी अधिकारी सहाय्यक निरीक्षक केदार यांनी सांगितले.