नाशिक – शहरात दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी दोनच्या सुमारास शहरात जोरदार पावसाला सुरवात झाली. जवळपास तासभर चाललेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील पंचवटी, अशोक स्तंभ तसेच द्वारका, नाशिकरोड परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. विजांच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने शहरातील भाजीविक्रेत्यांची त्रेधातिरपीट उडाली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राकडे सरकत असल्याने परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार परवापासून शहरात पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे उंचसखल भाग, अतीखोलगट भागात पाणी साचल्याने दिसून आले.