नाशिक – जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता साधारणतः एक आठवडा निर्बंध यांची सक्त अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार असून या परिस्थितीत नागरिकांनी सहकार्य न केल्यास 2 एप्रिल रोजी लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ.प्रशांत खैरे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांसोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला असून मागील वर्षापेक्षा बिकट परिस्थितीकडे वाटचाल सुरू आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. यासाठी पोलिसांनी निर्बंधांचे अंमलबजावणीमध्ये सक्रिय रित्या सहभागी होणे अत्यंत आवश्यक झालेले आहे, अशा सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
खाजगी डॉक्टर्स व लॅब यांनी महानगरपालिका व पोलिस यंत्रणांना गृहविलगीकरणातील रूग्णांची दैनंदिन माहिती कळविल्यास गृहविलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्या रुग्णांवर महानगरपालिका व पोलिस यंत्रणेने एकत्रितपणे कारवाई करावी. तसेच खाजगी डॉक्टर्सनी गृहविलगीकरणातील रुग्णांना आवश्यक त्या सुविधा आहेत किंवा कसे याबाबत देखील तपासणी करण्याची जबाबदारी पार पाडावी. त्याचप्रमाणे गृहसोसायटीच्या चेअरमन यांनी देखील आपल्या सोसायटीत गृहविलगीकरणात असलेल्या व कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्रशासनाला कळविण्यात यावी, असे आवाहन देखील पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी केले आहे.