नाशिक – महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या नाशिक आगारातर्फे सोमवारपासून बससेवा सुरु करण्यात आली आहे. यात इंदोर, अहमदाबाद, जळगाव येथील पाचोरा, बुलढाणा तसेच कोल्हापूर येथील प्रवासासाठी बससेवा सुरु करण्यात आली असून लवकरच आणखी बस सोडण्यात येणार असल्याचे नाशिक आगारतर्फे सांगण्यात आले आहे.
अहमदाबाद आणि कोल्हापूरसाठी सेमी स्लीपर बस सुरु करण्यात आल्या आहेत. ठक्कर बाजार येथून रात्री ८ वाजता कोल्हापूरसाठी तर ८.३० वाजता अहमदाबादसाठी या बस सुटणार आहे. तसेच इंदोरसाठी साधी बस सकाळी १०.३० वाजता सुटणार आहे. शासनाच्या आदेशानुसार बसचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम शिथिल करण्यात आल्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी बस सुटणार असल्याचे नाशिक आगारातर्फे सांगण्यात आले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई, पुणे, धुळे, जळगाव आणि औरंगाबाद येथे वाढीव बसेस सोडण्यासाठी चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई, पुणे तसेच धुळे या शहरांसाठी धावणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची संख्या जास्त असल्याचे म्हंटले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सद्य स्थितीला बसमध्ये क्षमतेच्या ४० टक्के प्रवासी येत असल्याने हळूहळू प्रवाशांची संख्या वाढल्यास जादा बस सोडण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.