नाशिक – बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या नरेडकोच्या “नरेडको वेस्ट फॉउंडेशन”ची राज्य युवा कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम नेक्स्ट जेनरेशन युथ विंगची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये नाशिकच्या ३ तरुण बांधकाम व्यवसायिकांची निवड करण्यात आली आहे.
नरेडको पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक व्यवसायात स्थित्यंतरे येतच असतात. बांधकाम क्षेत्रही यास अपवाद नाही. बांधकाम व्यवसायात नवीन पिढी लाभत असून युवक वर्गाच्या ऊर्जेचा प्रभावी वापर संघटनेत केला जावा यावर नरेडकोच्या सदस्यांचे एकमत आहे. यास्तव कार्यकारिणी निवडीत प्रथम नेक्स्ट जेनरेशन युथ विंगचे स्थापना करण्यात आली आहे. प्रथम नेक्स्ट जेनरेशन युथ विंगच्या अध्यक्षपदी जय मोरझारीया तर उपाध्यक्षपदी भाविक ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे.
भाविक ठक्कर यांनी मास्टर इन कन्स्ट्रकशन मॅनेजमेंट व बिल्डिंग इन्फॉरमेशन मॉडेलिंग या नवीन तंत्रज्ञान विषयावर लंडन येथे शिक्षण प्राप्त केले आहे. संपूर्ण भारतभर भविष्यात या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तसेच, नेक्स्ट जेनरेशन युथ विंग महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून करण दर्यानी व विराज झाला यांची निवड करण्यात आली आहे. बांधकाम उद्योगात नवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून उद्योग प्रतिष्ठा वाढविण्याकरिता कार्यरत राहण्याचा मानस निवडकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
नाशिकमधील युवा बांधकाम व्यवसायिकांचा नरेडको महाराष्ट्र कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. नाशिकच्या बांधकाम व्यवसायिकांनी सदर निवडीचे स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे, तसेच नरेडको महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत अनुभवी व युवा वर्गाच्या समन्वयाने कामकाज करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले आहे.