नाशिक : धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार, आदिवासी, कष्टकरी महिला आणि स्त्री मुक्ती चळवळीला नेहमी सक्रिय असणार्या अनिता पगारे यांचे कोरोनामुळे रविवारी (दि. २८) निधन झाले. त्यांच्या जाण्याने नाशिकच्या सामाजिक चळवळीला मोठी हानी पोहचली आहे. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास होता.
घंटागाडी कामगारांच्या प्रश्नांवर लढा उभा करणारे मनोहर आहिरे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली असा परिवार आहे. अनिता पगारे यांची ‘वस्तीवरची पोरं’ ही वृतपत्रातील लेखमालिका आणि त्यानंतर प्रसिद्ध झालेला कथासंग्रह विशेष गाजला होता. सामाजिक कार्यकर्ते अरुण ठाकूर यांच्या समता आंदोलन या संघटनेच्या माध्यमातून अनिता पगारे सामाजिक चळवळीत सक्रिय झाल्या. दिल्ली येथे झालेल्या शेतकर्यांच्या आंदोलन अनिता पगारे सहभागी झाल्या होत्या. महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्याने लेखन करायच्या. लोक पंचायत आधार केंद्रात त्यांनी परित्यक्त्या महिलांसाठी काम केले. पोलीस विभागात त्यांनी काही वर्ष समुपदेशक आणि प्रशिक्षक म्हणून काम केले. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. संगिनी महिला जागृती मंडळाच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या.
लॉकडाऊन काळात त्यांनी विविध संस्थांच्या सोशल माध्यमांवर जेंडर, विशाखा गाईड लाईन यासंदर्भात प्रशिक्षण दिले. स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नांवर त्यांनी मोठा लढा दिला होता. शालेय विद्यार्थिनींच्या मासिक पाळी संदर्भात त्यांनी जागृती अभियान हाती घेतले होते. नाशिक, ठाणे, नगर जिल्ह्यातील अनेक सामाजिक आंदोलनात आणि चळवळीत त्यांचा हिरिरीने सहभाग होता.