नाशिक : दिल्ली पोलिसांनी भावना भडकावल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या तसेच सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास सोशल मीडियावरुन पाठिंबा देणा-या, मुळची स्विडन येथील रहिवासी असलेली मानवतावादी पर्यावरणवादी कार्यकर्ती नोबेल पुरस्कार विजेती ग्रेटा थनबर्गला नाशिक शहरात होऊ घातलेल्या संविधान सन्मानार्थ १६ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून आमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील हुतात्मा स्मारकात रविवारी (दि.७) विद्रोही साहित्य संमेलनाच्या नियोजन बैठक झाली. त्यात विविध विषयावर चर्चा झाली. त्यात उदघाटक म्हणून नोबेल पुरस्कार विजेती ग्रेटा थनबर्गला आमंत्रण देण्याचा निर्णय़ घेण्यात आला. या बैठकीत प्रा. प्रतिमा परदेशी, गणेशभाई उन्हवणे, काँ. किशोर ढमाले, राजू देसले,नितीन रोठे पाटील, मन्साराम पवार, प्रभाकर धात्रक, चंद्रकांत भालेराव, व्ही. टी. जाधव, सुभाष काकुस्ते आदींनी संमेलनाच्या नियोजन आणि भूमिकेबाबत मार्गदर्शन केले. प्रारंभी माता रमाई जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यानंतर प्रास्ताविक प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले. नाशिकमध्ये होणा-या विद्रोही सहित्य संमेलनाच्या नियोजीत समित्यांची चर्चा करण्यात आली. अखिल भारतीय संमेलनाच्या तारखांच्याच दिवशी हे संमेलन घेऊन प्रस्थापितांसमोर वैचारीक आणि सांस्कृतिक लढा देण्यास आणि संविधानाच्या सन्मानार्थ व बाबुराव बागुल, लोकशाहीर वामनदादा कर्डक, दादासाहेब गायकवाड, अरुण काळे आदी साहित्यिकांच्या विचारांना घेऊन आमनेसामने उभे ठाकणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला.
दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन, विविध समित्या, ठरावांबाबत चर्चा, एक मूठ धान्य, एक रुपया संकल्पनेवर आधारीत निधी संकलनासाठी, २० मार्च ते २५ मार्च या कालावधीत बाबुराव बागूल यांच्या स्मृतीदिनानिमित्त सप्ताह व त्यांचे निवासस्थान असलेल्या विहितगाव येथून मशाल ज्योत काढून संमेलनाचे दीपप्रज्वलन त्याच मशालीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस अश्पाक कुरेशी, सदाशिव गनगे, अर्जुन बागुल, विजया दुर्धवळे, राजेंद्र जाधव, नीलेश सोनवणे, वामनदादा गायकवाड, रवींद्र पगारे, ताराचंद मोतमल, दीपाली वाघ आदी उपस्थित होते.