मुंबई – डिप्लोमा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या एका युवकाचे मोठे कारनामे मुंबई पोलिसांमुळे उघड झाले आहेत. हा युवक अनेकांना गंडवत असल्याचे समोर आले आहे. त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे.
नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी (एनआयए) अधिकारी म्हणून काम करत असल्याचे भासवणाऱ्या २५ वर्षांच्या युवकाला पोलिसांनी अटक केली. दक्षिण मुंबईतील २१ वर्षीय महिलेला त्याने फसवण्याचा प्रयत्न केला. या आरोपाखाली गामदेवी पोलिसांनी नाशिकहून हर्षद सपकाळ या तरुणाला अटक केली. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात तक्रार दिली.
गामदेवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञानाचा (आयटी) डिप्लोमा असणारा हर्षद सपकाळ याने एनआयए अधिकारी म्हणून काम करीत असल्याचे सांगत वेबसाइटवर एका महिलेला लग्नाचा प्रस्ताव सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाठविला होता. त्या महिलेने प्रत्युत्तर दिले, त्यानंतर दोघांनी गप्पा मारण्यास सुरवात केली आणि सेलफोन नंबरची देवाणघेवाण झाली. विश्वास संपादन करण्यासाठी सपकाळ याने त्या महिलेला त्याच्या ओळखपत्राची छायाचित्रे आणि एनआयएच्या गणवेशातील छायाचित्रेही पाठविली. मात्र, या महिलेला शंका आल्याने तिने एनआयएला पत्र पाठविले. त्याने दिलेले ओळखपत्र व फोटोही पाठविले. त्यानंतर एनआयने खात्री केली असता कुठलाही व्यक्ती एनआयए मध्ये नोकरीला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना तक्रार दिली. अशी माहिती गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढला. तोतयागिरी करून फसवणूक करणे, सरकारी सेवक असल्याचे खोटे सांगणे याद्वारे भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणूक आणि बनावटपणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी नाशिकमध्ये सपकाळला शोधले. त्याचा फोन काही दिवस बंद होता, ज्यामुळे आम्ही त्याचा शोध घेऊ शकलो नाही. मात्र, बुधवारी रात्री आम्हाला कळले की तो नाशिक येथे आहे. त्यामुळे पोलिसांचे एक पथक नाशिकलाच होते. हर्षद नाशिकला घरी येताच पोलिसांनी त्याला पकडले. चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले. अटक केल्यानंतर सपकाळने त्वरित गुन्ह्याची कबुली दिली. सपकाळच्या राहत्या घरातून बनावट ओळखपत्र, अनेक आयुक्तालय आणि उपविभागीय कार्यालयांचे डुप्लिकेट रबर स्टॅम्प आणि एनआयएचे गणवेश जप्त करण्यात आले आहेत.
सपकाळला यापूर्वी एकदा अटक करण्यात आली आहे. एका सिनेमात भूमिका मिळाण्याच्या बहाण्याने त्याने नाशिकमध्येच एकाला ९ लाख रुपयांना फसवले होते. त्याच्याविरोधात नाशिकमध्ये बलात्काराचाही एक गुन्हा दाखल आहे. तसेच जालना येथील एका फसवणूकीच्या प्रकरणात त्याला अटक झाल्याचे मोहिते म्हणाले. सपकाळ याला न्यायालयात हजर केले असता, त्याला २४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.