नाशिक – माईंड स्पोर्ट ऑलिम्पियाड अंतर्गत दरवर्षी भरविल्या जाणाऱ्या “मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०२०” मध्ये नाशिकच्या आर्यन शुक्ल याने कांस्य पदक पटकाविले आहे. तशी माहिती त्याचे वडिल नितीन शुक्ल यांनी दिली आहे.
अतिशय प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम फक्त ३० खेळाडू सहभागी झाले होते. कोरोना च्या धोक्यामुळे यावेळेस स्पर्धा दरवर्षी प्रमाणे लंडन मध्ये न भरविता ऑनलाइन स्वरूपात पार पडली. भारतातील नामांकित प्रशिक्षक युझेबियस नोरोन्हा (जिनियसकीड इंडिया संस्था) यांच्या मार्गदर्शनाखाली ६ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. नाशिक चा आर्यन शुक्ल अवघ्या १० व्या वर्षी या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत होता.
अवघ्या काही सेकंदात विविध प्रकारचे अतिशय कठीण गणिताचे प्रश्न या स्पर्धेत विचारले गेले. १२ आकडी संख्येचे घनमूळ, वर्गमूळ, कोणत्याही तारखेचा वार सांगणे, मोठ्या संख्येचे गुणाकार,भागाकार, बेरीज, वजाबाकी अश्या अनेक प्रश्नाचा सामना स्पर्धकांना एकामागोमाग करणे गरजेचे होते.
प्राथमिक फेरीत आर्यनने सर्वाधिक गुणांची कमाई करत आपल्या गटात प्रथम स्थान पटकावले आणि अंतिम फेरीसाठी सहज पात्र ठरला. अंतिम फेरीत १४ स्पर्धक निवडलॆ गेले त्यात शेवटच्या प्रश्नापर्यंत अतिशय रोमांचक सामना झाला. दोन तासाहून अधिक वेळ अंतिम सामना सुरु राहिला आणि भारतीय वेळेनुसार रात्री २:३० वाजता स्पर्धा संपली. अवघ्या १० व्या वर्षी आर्यनने आपल्यापेक्षा अधिक वयाच्या आणि अनुभव असलेल्या स्पर्धकांना मागे टाकत ४ थे स्थान पटकावले. तसेच १७ वर्षाखालील जुनिअर गटात
” कास्य पदक” पटकावत भारताचा झेंडा जागतिक स्पर्धेत फडकावला. या स्पर्धेत गणित विषयात पी एच डी पर्यंत शिक्षण घेणारे आणि वय १० ते ५७ वर्ष असलेले स्पर्धक सहभागी झाले होते. वयाने सर्वात लहान असूनही असूनही आर्यनने आपल्या प्रतिभेची चुणूक सर्वाना दाखविली आणि स्पर्धेच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा पदक विजेता होण्याचा पराक्रम केला.
आर्यनने यापूर्वी २०१८ मध्ये तुर्की येथे मेमोरियाड मेंटल म्याथ स्पर्धेत १० पदकाची कमाई करत २ विश्वविक्रम केले आहेत. आर्यनच्या यशात गेली चार वर्षे आर्यन प्रशिक्षण घेत असलेली जिनियसकीड इंडिया या संस्थेचे प्रमुख युझेबियस नोरोन्हा, नाशिकचे नितीन जगताप तसेच सर्व प्रशिक्षक यांचे मोलाचे योगदान आहे.