नाशिक – नाशिकची ओळख धार्मिक नगरी अशी असली तरी शहरात असलेली शुद्ध हवा आणि आरोग्यपूर्ण वातावरण यामुळे अनेकजण सेकंड होम म्हणून नाशिकची निवड करत आहेत. नाशिककरांकडे असलेले हीच नैसर्गिक संपन्नता आज खरी ओळख ठरत आहे. त्यामुळे ही ओळख जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. क्रेडाई महाराष्ट्रकडून आयोजित करण्यात आलेल्या क्रेडाई राष्ट्रीय शिखर परिषद २०२१च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष जितेंद्र ठक्कर, क्रेडाई राष्ट्रीय सल्लागार समितीचे खजिनदार अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारीख,क्रेडाई महाराष्ट्र सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष रवी महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रेडाईने केलेल्या कामांचे कौतुक
क्रेडाई नाशिकने कोरोना काळात मोठी समाजपयोगी कामे केली. नाशिकमध्ये कोविड सेंटर उभारणीचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर क्रेडाईने पुढाकार घेतला. नुसते सेंटर उभारले नाही तर त्यात कलात्मकतेची जोड दिली. अनेक सोयी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. याशिवाय पोलीस, सामान्य नागरिक आदींना मास्क, कोरोना संरक्षण कीट औषध, गोळ्या आदींचे वाटप केले. त्याच्या या कामाची दखल प्रशासकीय अधिकारी, राज्य सरकार यांच्यासह थेट उपमुख्यमंत्र्यांनीही घेतली असल्याचे सांगितले. सोबतच आगामी मराठी साहित्य संमेलनाला देखील अशीच मदत करावी अशी इच्छा भुजबळ यांनी व्यक्त केली.
नाशिक होणार सायकल कॅपिटल
यावेळी त्यांनी सांगितले की, बांधकाम व्यवसायाने लोकांना स्थिरता दिली आहे. अनेक प्रकारे रोजगार निर्माण केले आहेत. त्यामुळेच बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने अनेक सवलती दिल्या आहेत. नाशिकची ओळख सायकल कॅपिटल होणार आहे. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये अनेक बदल होणार आहेत. ग्राहकाला आणि बांधकाम व्यवसायिक यांना फायदा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे येत्या काळात ग्राहक नक्कीच नवीन घरे घेतील त्यामुळे आर्थिक चालना मिळेल. कोरोना काळानंतर जी बाजारात मरगळ निर्माण झाली आहे, ती नक्कीच दूर होणार आह.त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बांधकाम व्यवसायावर अनेक संकटे आहेत, त्यांच्या मागण्या आहेत ते नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.
चेहरा हाच ब्रँड
सकाळच्या सत्रात क्रेडाई राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी परिषदेला मार्गदर्शन केले. रिअल इस्टेट व्यवसायातील मुल्ये यावर प्रकाश टाकला. काही वर्षांपासून बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. मात्र त्याचवेळी अनेक आव्हाने देखील नव्याने उभी राहिली आहेत. अशा वातावरणात काम करतांना वैयक्तिक इमेज तयार करा, तुमचा चेहरा हाच ब्रँड आहे .व्यवसाय आणि अर्थशास्त्र या विषयी पूर्ण माहिती ठेवा. यामध्ये वेळोवेळी होणारे बदल समजून घ्या. मोठी स्वप्ने पाहा, काम दुप्पट करा, लोकल ब्रँड तयार करा अशा शब्दात त्यांनी बांधकाम व्यवसायिकांमध्ये उत्साह भरला.
कर्ज हे टॉनिक म्हणून घ्या
ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांनी शहर विकास आणि पर्यावरण यावर बोलतांना त्यांनी सांगितले की, शहरांचा विकास करतांना पर्यावरणाचा मुख्यत्वे आणि स्वतंत्रपणे विचार करायला हवा. विशेष करून नद्या जपायला हव्या. नाशिकने मुळीच पुण्यासारखा विकास करून नये. शहराची वेगळी ओळख निर्माण करायला हवी असे सांगितले. तर एएसके ग्रुपचे सुनील रोहोकले यांनी बांधकाम व्यवसाय व अर्थकारण यावर माहिती दिली. रेरा कायदा आल्यावर बदल घडले आहे. जो कर्ज घेतो त्याने कर्जाची गरज ओळखायला हवी, बँकेला अजून विश्वास नाही. कर्जाची व्याज टक्केवारी कमी झाली नाही. कर्ज हे टॉनिक म्हणून घ्या स्टरोईड म्हणून घेऊ नका. कर्ज हे वर्किंग कॅपिटल म्हणून वापरा असे सांगितले.
सामाजिक बांधिलकीही
दुपारच्या सत्रात क्रेडाई राष्ट्रीय सल्लागार जितुभाई ठक्कर, क्रेडाई राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई राष्ट्रीय खजिनदार अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्र सचिव सुनील कोतवाल यांच्यात परिसंवाद झाला. यावेळी त्यांनी व्यवसाय करतांना कसा विकास साधला, त्यांचे व्यक्तिमत्व कसे घडते याची गुपिते सांगितले. सोबतच क्रेडाईचे काम करतांना समाज उपयोगी कामेही केली याचा आढावा घेतला. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी क्रेडाई नाशिकचे उपाध्यक्ष कुणाल पाटील, गौरव ठक्कर, अनिल आहेर, सागर शहा, विजय चव्हाणके, सचिन बागड, राजेश आहेर, नरेंद्र कुलकर्णी, अतुल शिंदे, अनंत ठाकरे, हंसराज देशमुख यांनी परिश्रम घेतले.