नवी दिल्ली – नाशिकमध्ये साकारली जाणारी निओ मेट्रो ही संपूर्ण देशासाठी रोल मॉडेल असणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल २ हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. नाशिकमध्ये ही मेट्रो साकारल्यानंतर हाच प्रकल्प अन्य शहरांमध्ये राबविण्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे नाशिक हे पुन्हा एकदा मैलाचा दगड ठरणार आहे.
दरम्यान, नाशिक निओ मेट्रोच्या घोषणेनंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन कौतुक केले आहे. तसेच, पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे आभार मानले आहेत. नाशिक निओ मेट्रो हा पथदर्शी प्रकल्प असून भाजप सरकारने तो मांडला होता, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
अर्थसंकल्पात मेट्रोसाठी भरघोस तरतूद झाल्याने येत्या ५ वर्षात नाशिकमध्ये निओ मेट्रो प्रत्यक्ष साकार होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे नाशिकला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणार आहे.
अशी असणार निओ मेट्रो
रेल्वेसारखी ही मेट्रो नसेल. त्यामुळे त्याला रेल्वे मार्ग नसेल. ही टायर असलेली बस असेल. जिला स्वतंत्र रस्ता असेल. नाशिकमध्ये २० हजार कोटी रुपयांचा निओ मेट्रो प्रकल्प साकारला जाणार आहे. सातपूरच्या श्रमिकनगर ते सीबीएस, सारडा सर्कल, द्वारका चौक ते नाशिकरोड असा या मेट्रोचा पहिला मार्ग असणार आहे. म्हणजेच, सातपूर मधील कामगार वस्तीला ही मेट्रो थेट रेल्वे स्थानकाशी जोडणार आहे. तर, दुसऱ्या मार्गावर मुंबई नाका, सीबीएस, अशोकस्तंभ, गंगापूर गाव असे असणार आहे. या दोन्ही मार्गात त्र्यंबकरोडवरील अमृत गार्डन चौक आणि मुंबई नाका हे दोन चौक जंक्शन असणार आहेत. या दोन्ही मार्गावर एकूण २९ थांबे असणार आहेत. महा मेट्रोने या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1356126736233029633
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1356126738036584448