नाशिक – देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे अन्न व पुरवठा आणि नागरी संरक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण समारंभ सकाळी ९ वाजून ०५ मिनिटांनी होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करत असताना शासनाने घालून दिलेल्या निकषांचे पालन करून उत्साहात परंतु किमान उपस्थितीमध्ये हा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ध्वजारोहणानंतर मा. पालकमंत्री जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा फेसबुक लाईव्ह द्वारे देऊन संबोधित करणार असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी कळविले आहे. नागरिकांनी या लिंक द्वारे या सोहळ्यात सहभागी व्हावे, प्रत्यक्ष सोहळ्याच्या ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.