नाशिक – नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलचे माजी प्राचार्य कै. रं. कृ. यार्दी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या व्याख्यानमालेचे आयोजन दरवर्षी केले जाते. प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि इतर प्रभावी व्यक्तींची भाषणे शैक्षणिक‚ सामाजिक राष्ट्रीय विषयांवर आयोजित केली जातात. विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे विचार व अनुभव ऐकण्याची संधी नाशिककरांना ह्या व्याख्यानमालेनी दिली आहे. या वर्षी ही व्याख्यानमाला दि. ०५ ते ०७/११ /२०२० दरम्यान रोज दुपारी ३. ०० वाजता झूम मीटिंग द्वारे (zoom app) आयोजित केली जाईल.
दि. ५/११/२०२० (गुरुवार) रोजी मा. श्री. सदाशिव उपाले, संयोजक, विद्याभारती महाराष्ट्र आणि गोवा राज्य शिशु वाटिका, कल्याण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर मार्गदर्शन करतील. दि. ६/११/२०२० (शुक्रवार) रोजी मा. संजीवनी तोफखाने, माजी कार्यवाह, महाराष्ट्र प्रांत, समरसता साहित्य परिषद, मुंबई ह्या महिला संत आणि समरसता या विषयावर आपले विचार मांडतील. दि. ७/११/२०२० (शनिवार) रोजी मा. श्री वासुदेव बिडवे, अभिलेखागार, संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत, पुणे हे आर्यांचे आक्रमण /स्थलांतर: मिथ्य आणि तथ्य या विषयावर आपली मते प्रकट करतील.
१९१८ मध्ये स्थापित, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक ही महाराष्ट्रातील १०० वर्षांहून अधिक जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. ना. शि. प्र. मंडळ आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यास राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी कठोरपणे प्रयत्न करत आहे. संस्था शिक्षणाची पातळी सुधारण्यासाठी आणि त्यातील गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. संस्था विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शिक्षणाच्या इतर भागधारकांसाठी अनेक अभ्यासक्रम, सह-अभ्यासक्रम आणि अतिरिक्त-पाठ्यक्रमात्मक उपक्रम राबविते. यातील एक उपक्रम म्हणजे स्वर्गीय रं. कृ.यार्दी स्मृती व्याख्यानमाला. जवळजवळ चार दशकांपासून ही सातत्याने चालणार्या भाषणाची मालिका आहे.
ऑनलाईन उपक्रम राबविण्याची संपूर्ण जबाबदारी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिक रोड वर सोपविण्यात आली आहे. डॉ. मीनल बर्वे, हिंदी विभाग प्रमुख, या उपक्रमांचे समन्वय साधतील.
व्यवस्थापकीय मंडळ, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे राजेंद्र कलाल, अध्यक्ष, अश्विनीकुमार येवला, सचिव प्रसाद कुलकर्णी, सहसचिव यांनी शिक्षणातील सर्व भागधारकांनी या ऑनलाईन व्याख्यानमालेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.