नाशिक – तमाम नाशिककरांनी माझे नाव ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी सुचवले ही आंतरिक हाक होती अशी मनस्वी भावना ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांनी व्यक्त केली. या संमेलनात माझ्या प्रदीर्घ साहित्य सेवेचा होणारा गौरव व सत्कार हा माझा घरचा सन्मान आहे असेही ते म्हणाले.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला दिनांक २६,२७ व २८ मार्च दरम्यान होते आहे. त्याला सहकुटुंब उपस्थित राहण्याचे निमंत्रण संमेलन निमंत्रक व लोकहितवादी मंडळाचेवतीने अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, विश्वस्त दिलीप साळवेकर, कार्याध्यक्ष मुकूंद कुलकर्णी व कार्यकारी सदस्य संजय करंजकर यांनी प्रत्यक्ष भेटून शहाणे यांना दिले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जुन्या आठवणीत रमलेल्या शहाणे यांनी आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेले सन १९४२ चे संमेलन, तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेले १९६४ चे गोव्यातील साहित्य संमेलन यातील अनुभव रंगवून सांगितले. शिवाय त्यांच्या सुचनेनुसार डाॅ. अ.वा.वर्टी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष असताना सुरु झालेले ज़िल्हा साहित्य संमेलन आजही भरते याबद्दल आनंद व्यक्त केला. अखेरीस ९४ व्या संमेलनात सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक आहोत असे त्यांनी सांगितले.