नाशिक – ओला आणि उबेरच्या धर्तीवर आता नाशिककरांच्या सेवेत जनता टॅक्सी दाखल झाली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाअंतर्गत नाशिकच्या तरुणाने हे अनोखा स्टार्टअप सुरू केले आहे. त्यात टॅक्सी व रिक्षाचालक, दुचाकी चालक यांना रोजगार तर ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, मोपेड आणि दुचाकीची सेवाही नाशिककरांना मिळणार आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्या सध्या टॅक्सी सेवा देत आहेत. मात्र, नाशिककर तरुणाने स्टार्टअपद्वारे शहराच्या सेवेत टॅक्सी, रिक्षा आणि मोपेड आणली आहे. जनता टॅक्सीचे समन्वयक संदीप जाधव यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली आहे. गुगल प्ले स्टोअरवर जनता टॅक्सी हे अॅप विनामूल्य उपलब्ध आहे. ते डाऊनलोड केल्यानंतर ग्राहकांना सेवेचा लाभ घेता येत आहे.
३ हजार वाहनांची सेवा
नाशिक शहरातील १ हजाराहून अधिक वाहनांची नोंद जनता टॅक्सीमध्ये झाली आहे. त्यामध्ये १५० पेक्षा अधिक टॅक्सी आणि ३०० पेक्षा अधिक रिक्षांचा समावेश आहे. या स्टार्टअपद्वारे रिक्षा, टॅक्सी आणि दुचाकीचालकांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. अल्पावधीतच हे डिटीटल स्टार्टअप नाशिककरांच्या पसंतीस उतरल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच या सेवेत ३ हजाराहून अधिक वाहने दाखल होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बहुविध सुविधा
ग्राहकांची सुरक्षेसाठी विविध उपाययोजना सेवेत करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत, वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी, कोरोनाच्या विविध नियमांचे पालन या आणि अशा अनेक बाबींची काळजी घेतली जात असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे.
बाईक व मोपेडची सेवा
नाशिक शहरात प्रथमच बाईक आणि मोपेडची सेवा उपलब्ध झाली आहे. पुरुषांसाठी बाईक आणि महिलांसाठी मोपेड सेवा सुरू करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले आहे. या सेवेत ग्राहकांना हेल्मेटही उपलब्ध करुन दिले जात आहे, असे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
—
नाशिककरांना दर्जेदार सेवा देण्याच्या हेतूने आम्ही जनता टॅक्सी सुरू केली आहे. प्रारंभीचा प्रतिसाद पाहून आमचे हे डिजीटल स्टार्टअप नक्कीच नाशिककरांच्या प्संतीस उतरल्याचे स्पष्ट होत आहे. यापुढील काळात सेवेचा विस्तार करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे.
– संदीप जाधव, समनवयक, जनता टॅक्सी
सुंदर संकल्पना
Gr8 vocal to local
U get best fare
And easy to use