नाशिक – शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस पुन्हा वाढत आहे. कोविड रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी मिळावी, यासाठी शहरातील दहा खासगी रुग्णालयांनी नाशिक महानगरपालिकेकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे लवकरच या खासगी रुग्णालयांना उपचारासाठी परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय अधीक्षक बापुसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.
नागरगोजे म्हणाले की, राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, नागपूर प्रमाणेच नाशिक शहरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने महापालिकेलाही अधिक बेडची गरज आहे. सद्यस्थितीत ८४ खासगी रुग्णालये असून त्यामध्ये ८१ खासगी रुग्णालये आणि तीन सरकारी रुग्णालये यांचा समावेश आहे. त्यात ३१७० बेड हे कोविड रुग्णांना उपचार देण्यासाठी सध्या राखीव असून आता आणखी प्रत्येक रुग्णालयात कोविड रूग्णांना सुमारे २० ते ४० बेड पुरवले जातील. त्यामुळे या रुग्णालयांमधील बेडची संख्या आणखी जास्त होईल.
खासगी रुग्णालयांमध्ये २३५० कोविड बेड आहेत, तर मनपाकडे एकूण १३५० कोविड बेड आहेत. त्यापैकी ७०० बिटको रूग्णालयात, झकीर हुसेन रुग्णालयात १५० आणि ५०० बेड राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृह इमारतीत आहेत.
सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये कोविड बेडच्या संख्येत वाढ झाली आहे. समाज कल्याण विभागाच्या इमारतीत पुन्हा कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. शहरातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता खासगी रुग्णालयांनी परवानगी मागितली असून महापालिकाही त्यांना परवानगी लवकरच देणार असल्याचे चित्र आहे.