नाशिक – शेतकऱ्यांना फसविणाऱ्या तोतया कांदा व्यापाऱ्यास पंचवटी पोलिसांनी भिवंडी (जि. ठाणे) येथे अटक केली आहे. जास्त मोबदल्याचे आमिष दाखवून व मार्केट यार्डात स्व:ताचा माल असल्याचे भासवून हा व्यापारी रोकड घेऊन फरार झाला होता. याप्रकरी शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती.
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इजाज उस्मान मन्सुरी (४० रा.दुधबाजार काजीपुरा हल्ली फिरस्ता) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी नानाजी साळवे (रा.मटाणे ता.देवळा) यांनी तक्रार दाखल केली होती. साळवे १८ नोव्हेंबर रोजी कांदा विक्री करण्यासाठी पेठरोडवरील शरद पवार मार्केट मध्ये आले होते. मुन्ना ट्रेंडिग कंपनी येथे त्यांनी आपला माल उतरविला असता ही घटना घडली होती. संशयीताने साळवे यांना गाठून व्यापारी असल्याचे भासविले. यावेळी जास्त मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून जागेवरच त्यांच्याकडून ६० गोणींमध्ये असलेला २९ क्विंटल ४५ किलो कांदा २७ रूपये किलोने खरेदी केला.प्रत्यक्षात त्याच ठिकाणी लिलावात हा कांदा २० रूपये दलाने गेला. यानंतर मात्र संशयीताने पेढी चालकाकडून ५८ हजार ५०० रूपयांची रोकड पदरात पाडून पोबारा केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पंचवटीचे गुन्हे शोध पथक त्याच्या मागावर होते.
सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून शोध घेतला असता संशयीताचे नाव उघड झाले. परंतू तो फिरस्ता असल्याने तपासात अडचणी येत होत्या. तांत्रीक शाखेच्या मदतीने त्याच्या मोबाईलचे लोकेशन घेतले असता तो गुजरात राज्यासह मुंबई,ठाणे आणि भिवंडी भागात फिरत असल्याचे समोर आले. त्यानुसार वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली होती. भिवंडी येथे तळ ठोकलेल्या पथकाने बुधवारी (दि.९) त्यास बेड्या ठोकल्या संशयीताने गुह्याची कबुली दिली असून त्याच्या अटकेने मालेगाव,सटाणा आणि कन्नड (औरंगाबाद) येथेही अश्याच प्रकारे शेतकºयांची फसवणुक केल्याचे समोर आले आहे. ही कारवाई उपायुक्त अमोल तांबे,सहाय्यक आयुक्त प्रदिप जाधव,वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत व गुन्हे शोध पथकाचे निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली व तांत्रीकचे उपनिरीक्षक देसले आणि शिपाई रामनाथ पाटील यांच्या मदतीने सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार शिपाई विलास चारोस्कर व नितीन जगताप आदींच्या पथकाने केली.