नाशिक – शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून गेल्या २ आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या जवळपास चौपट झाली आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अनेक निर्बंध लागू केले आहेत. त्याच अंतर्गत नाशिक शहरासह जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी जवळपास पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. याअंतर्गत सर्व दुकाने, मॉल्स, शो रुम्स, बाजारपेठा या बंद राहणार आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंना सूट देण्यात आली आहे. येत्या शनिवारपासून (१३ मार्च) याची अंमलबजावणी होणार आहे.
दरम्यान, सध्या लागू करण्यात आलेल्या निर्बंधांनंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव थांबला नाही तर आणखी कठोर निर्णय घेण्यात येतील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे सध्याच्या निर्बंधांचे कसोशीने पालन होणे आवश्यक आहे.
—
नाशिक जिल्हा व शहरातील विविध निर्बंधसंदर्भातील आदेश काल रात्रीच पाठवण्यात आलेले आहेत. शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी सर्व दुकाने (जीवनावश्यक सोडून) व धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद राहतील अशी स्पष्ट तरतूद त्या आदेशामध्येच आहे. शनिवारी व रविवारी सुट्टीचा फायदा घेऊन होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने हे निर्देश दिलेले आहेत.
-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक