नाशिक – शहरातील रस्ते दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी नाशिक महानगरपालिकेने २२५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. शहरातील सहा विभागातील विविध रस्त्यांच्या कामांच्या निविदाची प्रक्रिया आठवड्याभरात सुरू केली जाणार असून रस्त्यांच्या कामांची अंमलबजावणी डिसेंबरअखेर सुरू होणार आहे.
मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार दिवाळीनंतर हे काम हाती घेण्यात येईल. पावसाळ्यात शहरातील बहुतेक रस्ते नादुरूस्त व खराब झाले. तात्पुरती दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असली तरी दिवाळी सणांनंतर आता संपूर्ण रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल.
दरम्यान, महापौर सतीश कुलकर्णी यांनी या संदर्भात सांगितले की, शहरातील सहा विभागातील विविध रस्त्यांच्या कामांचे निविदा आठवड्याभरात सुरू केले जाणार असून रस्त्यांच्या कामांची अंमलबजावणी डिसेंबरअखेर सुरू होण्याची शक्यता आहे.
सदर रस्ते सध्याच्या आर्थिक वर्षात (२०२०-२१) महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहेत. अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे, असेही कुलकर्णी म्हणाले. तसेच शहरात व नववसाहतीमधील असे अनेक रस्ते लवकरच तयार करण्यात येणार आहेत. असेही सांगण्यात येते.
शहर अभियंता संजय घुगे म्हणाले, आम्ही संबंधीत रस्ते कामांचे नियोजन केले आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची एकूण लांबी २५०० किमी आहे. त्यापैकी २ हजार किमी एकूण डांबरी रस्ता होणार आहे. नागरिकांकडून रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तक्रारी येत आहेत. मागील महिन्यात पाऊस पडला होता आणि आता दिवाळी जवळ आली आहे. महापालिकेने रस्त्यांवरील काही खड्डे दुरुस्त केले आहेत, परंतु कामगारांच्या अभावामुळे काम अजून पूर्ण झालेले नाही.