भाजी बाजारात महिलेचे गंठण लांबविले
नाशिक – भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात गेलेल्या महिलेचे सोन्याचे गंठण चोरट्या ग्राहक महिलांनी हातोहात लांबविल्याची घटना महालक्ष्मी नगर भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्योती सुरेश धोंगडे (रा.सिताराम गिरणी शेजारी,महालक्ष्मीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. धोंगडे शुक्रवारी (दि.२) भाजीपाला खरेदी करण्यासाठी परिसरातील भाजीबाजारात गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करीत असतांना गर्दीत आजू बाजूला उभ्या असलेल्या अज्ञात भामट्या महिलांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ३८ हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठण हातोहात लांबविले. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
—
महिलेचे मंगळसूत्र खेचले
नाशिक – फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना गंगापूररोड भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मिता प्रशांत देवरे (रा. लोकमान्यनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. देवरे या शुक्रवारी (दि.२) आपल्या मुलीस सोबत घेवून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. गंगापूररोडने विद्याविकास मार्गे जेहान सर्कल कडून फेरफटका मारून मायलेकी आपल्या घरी जात असतांना शगुन डायनिंग हॉल समोर विरूध्द दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने देवरे यांच्या गळ््यातील सुमारे ४० हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.