नाशिक – शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने शहरी तसेच खासगी हॉस्पिटलमधील तब्बल ८० टक्के बेड रिकामे आहेत. शहरातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याचे आढळून आले आहे. कोरोना संक्रमण कमी होत असल्याने रुग्ण संख्या कमी होते आहे. त्यामुळे शहरातील ८० टक्के बेड सद्यस्थितीला रिकामे असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शहरातील कोरोना बाधितांचा रिकव्हरी रेट ९४ टक्के आहे. एकूण ४५७० बेड पैकी ३६२८ बेड सध्या रिकामे आहेत. २२३८ ऍक्टिव्ह रुग्ण असून ९४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्य शासनाच्या अंदाजानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. त्याअनुषंगाने कोणताही धोका न पत्करता सर्व तयारी व सुविधा कायम असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच सणाच्या दिवसात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढणार असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.